होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची आघाडी

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची आघाडी

Published On: Jun 24 2018 1:34AM | Last Updated: Jun 24 2018 1:04AMमुंबई : प्रतिनिधी

स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या अमृत शहरे स्पर्धेत राज्यातील 28 शहरांनी राष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या शंभर क्रमांकामध्ये स्थान मिळविले असून त्यामध्ये नवी मुंबई, पुणे, मुंबई यांचा समावेश आहे. तर एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्पर्धेत पश्चिम विभागात राज्यातील 58 शहरांनी स्थान मिळविले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 4 जानेवारी ते 10 मार्च 2018 या कालावधीत देशातील 4203 शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील 43 अमृत शहरांनी तर एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असेल्या 217 शहरांनी सहभाग घेतला होता. देशपातळीवरील या स्वच्छ सर्वेक्षणची क्रमवारी शनिवारी मध्य प्रदेश इंदोर येथे झालेल्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आली. यावेळी स्वच्छ भारत सर्वेक्षणमध्ये देशात दुसरा क्रमांक मिळविल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला पुरस्काराने गौरविण्यात आले. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी राज्याचे पुरस्कार स्वीकारले. 

स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये गेल्या वर्षीपेक्षा यंदा राज्यातील सर्वात जास्त शहरांनी क्रमांक पटकविला आहे. राज्याला यापूर्वीच स्वच्छ सर्वेक्षणात देशातील सर्वोकृष्ट दुसर्‍या क्रमांकाच्या राज्यासह विविध विभागातील  एकूण 52 पारितोषिकांपैकी सर्वाधिक एकूण दहा पारितोषिके जाहीर झाली आहेत. देशातील स्वच्छ राजधानीच्या शहराचा मान मुंबई शहरास तर घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबई शहराने बाजी मारली आहे. स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रातील 9 शहरे स्वच्छ शहरे ठरली असून यातील 6 शहरांना राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे तर 3 शहरांना विभागस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. 

नागपूर शहराला नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा, परभणीला नागरिक प्रतिसादमध्ये, भिवंडी शहरास गतिमान मध्यम शहराचा, भुसावळ शहरास गतिमान लहान शहर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर विभागस्तरीय स्तरावर सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहराला पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा पुरस्कार, नागरिक प्रतिसादासाठी दिला जाणारा पुरस्कार अमरावती जिल्ह्यातील शेंदुर्जना घाट शहराला आणि पुणे जिल्ह्यातील सासवड शहराला नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.