Tue, May 21, 2019 19:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुलगी दत्तक घेण्यात महाराष्ट्र देशभरात प्रथम क्रमांकावर

मुलगी दत्तक घेण्यात महाराष्ट्र पहिला

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 2:18AMमुंबई : प्रतिनिधी

मुलगाच वंशाचा दिवा आहे, असे मानणार्‍या समाजात मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. कुस्तीपासून ते नेमबाजीपर्यंत व कुलगुरूपदापासून ते राजकारणापर्यंत अनेक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणार्‍या महाराष्ट्रात लेकींना दत्तक घेण्यासाठी सर्वाधिक पसंती  आहे. मुलींना दत्तक घेण्याचे हे प्रमाण मुलगी झाली म्हणून तिचे नाव नकुशी ठेवणार्‍यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे.

मुलगा झाला नाही म्हणून दुसरे लग्‍न करण्यापासून ते मुलगा होण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी करून मुलीचा जन्म होण्यापूर्वीच ती कळी कुस्करणार्‍या समाजाला मुली दत्तक घेणार्‍यांनी चांगला धडा  दिला असून, ‘लेक वाचवा’ हे सरकारचे अभियान मुलींना जन्म देणार्‍यांच्या  बरोबरीने मुलींना दत्तक घेणार्‍यांनी यशस्वी करून दखविले आहे.

गर्भलिंग निदानावर बंदी असली तरी चोरट्या मार्गाने होणार्‍या या तपासणीचा बुरखा सरकारी यंत्रणांनी फाडला आहे. अनेकांनी या व्यवसायात आपले उखळ पांढरे करून घेतले असले तरी तपासणी पथकाच्या पाहणीनंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगाही उगारण्यात आला.  गेल्या काही वर्षापासून सरकारी पातळीवर लेक वाचवा अभियान राबविले जात आहे. त्यामध्ये ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेंतर्गत मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर ठेवही ठेवण्यात येते. मात्र, एकूणच या सगळ्या चळवळीला या दत्तक प्रकरणाने वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.

कर्नाटक दुसर्‍या स्थानावर

मुले दत्तक देणार्‍या प्राधिकरणाने याबाबतची आकडेवारी माहितीच्या अधिकारात दिली आहे. 2016 -17 साली देशभरातून 3 हजार 210 बालकांना दत्तक देण्यात आले. त्यापैकी 1 हजार 915 या मुली होत्या. त्यामध्ये महाराष्ट्राचे प्रमाण 711 म्हणजे एकूण दत्तकच्या प्रमाणात 60 टक्के होते. तर कर्नाटकात 252 मुली दत्तक घेण्यात आल्या. पश्‍चिम बंगालमध्ये 203 मुली दत्तक घेण्यात आल्या.अ2017-18 साली एकूण 3 हजार 276 मुले दत्तक देण्यात आली, त्यामध्ये मुलींचे प्रमाण हे 1 हजार 858 एवढे आहे. तर 1 हजार 418 मुले दत्तक देण्यात आली. दत्तक घेण्यात महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान मिळविले आहे. जी 1 हजार 858 बालके दत्तक देण्यात आली, त्यामध्ये महाराष्ट्रातून एकूण 642 मुले दत्तक देण्यात आली त्यामध्ये 353, तर कर्नाटकमधून 286 मुले दत्तक देण्यात आली. त्यामध्ये 167 मुलींचा समावेश आहे.

Tags : Mumbai, mumbai news, Maharashtra ranks first,  adopted daughter,