होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एप्रिलपासून महाराष्ट्राची गगनभरारी !

एप्रिलपासून महाराष्ट्राची गगनभरारी !

Last Updated: Feb 26 2020 1:52AM
मुंबई : चंदन शिरवाळे

कमी कालावधीमध्ये प्रवाशांच्या आवडीचे विमानतळ म्हणून नावारुपास आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी विमानतळावरुन एप्रिलपासून दररोज किमान 50 विमाने भरारी घेतील. तर कोकणवासीयांचे भविष्य उजळविण्यास मोलाचा ठरणारा बहुप्रतीक्षित चिपी विमानतळ अखेर मेमध्ये सुरू होणार आहे. पाठोपाठ अमरावती व अकोला येथील धावपट्ट्यांचे काम जुलैअखेर पूर्ण होणार असून सोलापुरातील बोरामनी व चंद्रपूरमधील राजुरा विमानतळासाठी झपाट्याने भूसंपादन सुरू असल्यामुळे महाराष्ट्राची एप्रिलपासून गगनभरारी सुरू होणार आहे. 

शिर्डीसाठी विविध राज्यांतून प्रवासी येत असल्यामुळे दिवसाची उड्डाणे कमी पडू लागली. रात्रीच्या उड्डाणाची सोय व्हावी, यासाठी तांत्रिक कामांसाठी निविदा काढण्यात आली होती. डिसेंबर 2019 अखेर हे काम पूर्ण होऊ शकले नाही. आता कंत्राटदाराने एप्रिल 2020 पर्यंत काम पूर्ण करणार असल्याचे सांगितले. टर्मिनल इमारतीचे कामही लवकरच पूर्ण केले जाणार आहे. सध्या येथून दिवसाला 28 उड्डाणे होतात. एप्रिलपासून या विमानतळावरुन 50 विमाने झेप घेतील, असा दावा महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने केला.

पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील खांदेश्वर परिसरात नवी मुंबई विमानतळ प्रस्तावित आहे. या परिसरातील बाधित झालेल्या 10 पैकी 8 गावांनी स्थलांतर केले आहे. उर्वरीत 2 गावे येत्या मेअखेर रिकामी होणार आहेत.

सुमारे 4 हजार मीटर लांबीची या विमानतळाची धावपट्टी असून खाडीमध्ये 8 मीटर भराव टाकून ती तयार करण्यात येत आहे. दोन गावे रिकामी झाल्यानंतर येथील कामांना गती येणार आहे. पुण्यातील पुरंदर येथील विमानतळ 2 हजार हेक्टरवर उभारण्यात येणार आहे. चार हजार मीटरच्या दोन धावपट्टींचे हे विमानतळ असेल. केंद्र सरकारच्या नागरी संरक्षण दलाकडून या विमानतळाला नुकतीच परवानगी मिळाली आहे.

सोलापूर येथील विमानतळाचा विस्तार करण्यात येणार होता. पण होटगी येथील सिध्देश्वर साखर कारखान्याचे धुराडे आडवे येत आहे. त्यामुळे सोलापूरपासून 12 किलोमीटरवर बोरामनी येथे नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 550 हेक्टर जमीन संपादित केली असून उर्वरीत 32 हेक्टर बाकी आहे. भूमिसंपादनाचे काम वर्षभरात पूर्ण होईल. अधिकार्‍यांनी सांगितले की, अमरावती विमानतळाची धावपट्टी 1800 मीटरहून 2300 मीटर करण्यात येत आहे. 

जुलै अखेर हे काम पूर्ण होईल. येथील नवीन टर्मिनल इमारतीसाठीच्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चंद्रपूरच्या मोर्बा विमानतळाचे विस्तारीकरण शक्य नसल्याने राजुरा येथे नवीन विमानतळ उभारण्यात येईल. अकोल्यात कमी लांबीची धावपट्टी असल्याने लहान विमाने उतरतात.तेथे धावपट्टी वाढविण्यात आली असून परवानग्या मिळाल्यानंतर मोठ्या विमानांचे लँडिंग होऊ शकेल.    (क्रमशः)

  •     ‘चिपी’हून उड्डाण मेमध्ये
  •     शिर्डीतून एप्रिलपासून दररोज पन्नास विमानांची भरारी
  •     नवी मुंबईतील कामे दोन महिन्यानंतर धरणार वेग 
  •     सोलापुरातील बोरामनी विमानतळाचे भूसंपादन अखेरच्या टप्प्यात
  •     अमरावती, अकोला येथील धावपट्टीचा विस्तार जुलैअखेर 
  •     चंद्रपुरातील राजुरा येथे नवीन विमानतळाचे भूसंपादन सुरू