Thu, Aug 22, 2019 14:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा आरक्षण वैद्यकीय प्रवेश तिढा सुटला

मराठा आरक्षण वैद्यकीय प्रवेश तिढा सुटला

Published On: May 16 2019 5:25PM | Last Updated: May 16 2019 5:41PM
मुंबई : प्रतिनिधी

मराठा आरक्षण वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रकरणी अध्यादेश काढण्यासाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

उद्या हा अध्यादेश काढला जाणार आहे. तर अध्यादेश मंजुरीसाठी शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठक घेतली जाणार आहे. यामुळे मराठा आरक्षण वैद्यकीय पदव्युत्तर तिढा सुटण्याची चिन्हे दिसत आहे.

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश रद्द झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी, राज्य सरकारने वटहुकूम काढण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्‍न आणि तातडी पाहता वटहुकूम काढण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्यात आली होती. यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया २५ मेपर्यंत पूर्ण करण्याची मुदत न्यायालयाने दिली आहे. ही मुदत देखील ३१ मेपर्यंत वाढविण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडेही वैद्यकीय प्रवेशाच्या जागा वाढवून मागण्यात आल्या आहेत. 

महसूल मंत्री व मराठा आरक्षण अंमलबजावणी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चा, मराठा ठोक मोर्चाच्या समन्वयक तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी मंत्रालयात चर्चा केली. या चर्चेत राज्य सरकार मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश कायम करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. राज्य सरकार एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ देणार नाही, अशी हमीही त्यांनी दिली. त्यामुळे प्रवेशाच्या मुद्द्यावर निर्माण झालेली कोंडी सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रद्द झालेले वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश कायम व्हावेत, म्हणून मराठा विद्यार्थ्यांनी गेले आठवडाभर आझाद मैदानात उपोषण सुरू आहे.