Fri, Jul 19, 2019 00:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लिटरमागे अनुदान देणे अशक्य : मुख्यमंत्री  

लिटरमागे अनुदान देणे अशक्य : मुख्यमंत्री  

Published On: Jul 16 2018 10:41AM | Last Updated: Jul 16 2018 10:43AMनागपूर : विशेष प्रतिनिधी 

फक्त ४० टक्केच सहकारी दूध संघामार्फत संकलित होते. ६० टक्के दूध हे खासगी दूध संघामार्फत संकलित होत आहे. जर दुधासाठी प्रती लिटर अनुदान दिले तर नवीन घोटाळे होतील. त्यामुळे दुधासाठी लिटरमागे अनुदान देणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

खासदार राजू शेट्टी यांचे आंदोलन चुकीचे असून राज्य सरकारची चर्चेची तयारी आहे, असेही ते म्हणाले. पावसाळी अधिवेशनाच्या वृत्तसंकलनासाठी नागपूर येथे आलेल्या पत्रकारांशी 'सुयोग' निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. 

ते म्हणाले, की राज्य सरकारने दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी दूध भुकटी निर्यातीसाठी ५ रुपयांचे अनुदान दिले आहे. त्यामुळे दुधाचे दर हे लिटरमागे ३ रुपयांनीं वाढले आहेत. मात्र लिटरमागे अनुदान देण्यात अडचणी आहेत. सरकारकडे खासगी दूध संघाकडून राज्यभर संकलित होणाऱ्या दुधाची निश्चित आकडेवारी नाही. कर्नाटकमध्ये एकच दूधसंघ असल्यामुळे तेथे लिटरमागे अनुदान देणे शक्य आहे. मात्र, राज्यात तशी परिस्थिती नसल्याने असे अनुदान देता येणार नाही. गुजरातमध्येही दूध भुकटीलाच अनुदान देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

राजू शेट्टी यांच्याबरोबर चर्चा करायला आम्ही तयार आहोत, पण त्यांना चर्चा करायची नाही, असे सांगतानाच या आंदोलनामुळे दूध पुरवठा खंडीत होऊ नये म्हणून राज्य सरकारने आवश्यक ती काळजी घेतली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.