Fri, Jul 19, 2019 05:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रालय झाले सावध !

मंत्रालय झाले सावध !

Published On: Feb 04 2018 2:16AM | Last Updated: Feb 04 2018 2:15AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 
मंत्रालयात वारंवार होणारे आत्महत्येचे प्रयत्न आणि सुरक्षेसाठी मंत्रालयात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 432 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. येत्या महिनाभरात हे काम पूर्ण केले जाणार आहे. या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातून मंत्रालयात येणार्‍या जाणार्‍यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. 

धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी नुकतीच मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केली. त्याचप्रमाणे मंत्रालयात अलीकडे कीटकनाशके घेऊन येणे, रॉकेल घेऊन येण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकरणात काही जणांना अटकही करण्यात आली आहे. मंत्रालयात यापूर्वी एकाच दिवशी तीन जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. शुक्रवारी देखील अक्कलकोट येथील एका तरुणाला कीटकनाशकासह अटक करण्यात आली. त्यामुळे सरकार सावध झाले असून मंत्रालयात काय घडतेय यावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

432 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्यामुळे पोलीस मंत्रालयाच्या प्रत्येक कोपर्‍यावर नजर ठेऊ शकतील. धर्मा पाटील यांनी विष प्राशन केले असले तरी ते नेमके कधी व कसे केले हे मात्र अद्यापि समजू शकलेले नाही. या सीसीटीव्हीसाठी स्वतंत्र कंट्रोल रूमही असेल.