Mon, Jun 17, 2019 15:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महिलांवर महाराष्ट्रात सर्वाधिक अत्याचार

देशात महिलांवर सर्वाधिक अत्याचार महाराष्ट्रात

Published On: Dec 01 2017 9:22AM | Last Updated: Dec 01 2017 9:22AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

सावित्रीच्या लेकी असा लौकिक मिरवणार्‍या महाराष्ट्रात महिलांवर होणारे अत्याचार केवळ वाढले नसून देशात महिलांवर सर्वाधिक अत्याचार हे महाराष्ट्रात झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

सायबर गुन्ह्यांमध्ये राज्य दुसर्‍या क्रमांकावर आहे. महिलांवरील हल्ल्यांचे राज्यात तब्बल 11 हजार 396 गुन्हे नोंद झाले आहेत. तर उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर आहेत. 64 हजार 519 महिला आणि मुलींच्या अपहरणाची नोंद झाली असून 6 हजार 170 गुन्ह्यांसह महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर देशभरात बलात्काराच्या 38 हजार 947 दाखल गुन्ह्यांपैकी 4 हजार 189 गुन्हे एकट्या महाराष्ट्रात घडले असून राज्य बलात्काराच्या गुन्ह्यात देशात तिसर्‍या क्रमांकावर पोहचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही मुंबईत सर्वाधिक 23.3 टक्के एवढे नोंदवण्यात आले आहे. देशभरात महिलांविरोधात हिंसेचे तब्बल 3 लाख 38 हजार 954 गुन्हे दाखल झाले आहेत. 2015 साली घडलेल्या 3 लाख 29 हजार 243 गुन्ह्यांच्या तुलनेत हे प्रमाण 2.9 टक्क्यांनी वाढले असून यात सर्वाधिक घरगुती म्हणजेच पती आणि जवळच्या नातेवाइकांकडून करण्यात आलेल्या हिंसाचाराचे 1 लाख 10 हजार 378 गुन्हे दाखल झाले आहेत.

हत्याकांडांमध्ये महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर

2016 सालामध्ये देशामध्ये 30 हजार 450 हत्येच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यातील 5 हजार 179 गुन्हे पूर्ववैमनस्य आणि दुश्मनीतून घडले असून मालमत्तेच्या वादातून 3 हजार 424 हत्या झाल्या आहेत. मात्र 2015 सालच्या तुलनेत हे प्रमाण 5.2 टक्क्यांनी घटले असून 4 हजार 889 गुन्ह्यांसह उत्तर प्रदेश यात आघाडीवर आहे. 2 हजार 581 गुन्ह्यांसह बिहार दुसर्‍या स्थानावर तर, 2 हजार 299 गुन्ह्यांसह महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर आहे. 2015 च्या तुलनेत देशभरातील गुन्ह्यात वाढ 48 लाख 31 हजार 515 दखल पात्र गुन्ह्यांची नोंद झाली असून 29 लाख 75 हजार 711 गुन्हे भादंवि कलमांतर्गत, तर 18 लाख 55 हजार 804 गुन्हे विशेष कायदे आणि स्थानिक कायद्यानुसार दाखल झाले आहेत. 2015 सालच्या दाखल गुन्ह्यांच्या तुलनेत तब्बल 2.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.