Wed, Mar 27, 2019 04:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्र तापला

महाराष्ट्र तापला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई/ठाणे/ डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

ऐन चैत्रात महाराष्ट्रभर वैशाख वणवा पेटला असून रविवारप्रमाणेच सोमवारीही मुंबईत सांताक्रुझला 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या उष्णतेच्या लाटेत सोमवारी ठाणेकरही होरपळून निघत असून  शनिवारी 40 अंश डिग्री सेल्सिअसवर असलेला पारा  रविवार आणि सोमवारी 44 अंश सेल्सिअसवर पोहोचला.  कल्याण, डोंबिवलीतील पार्‍याने सोमवारी दुपारीच  चाळीशी ओलांडली आणि दुपारी 2 नंतर कल्याण-डोंबिवलीत तब्बल 41.7 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पूर्वेकडून जमिनीवरून येणार्‍या कोरड्या वार्‍यांचा प्रभाव येत्या दोन दिवसांत वाढणार आहे. या वार्‍यांमुळे उष्णतेची लाट येण्याची भीती  हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येती होती, ती भीती खरी ठरली. पुढील 24 तासांत मुंबईमध्ये पारा वाढण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. मुंबईतील सरासरी 79 ते 90 टक्क्यांवर गेलेली आर्द्रता आणि समुद्रावरून दुपारच्या वेळेस येणारे खारे वारे उशिराने वाहत आहेत. त्यामुळे तापमानामध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांतील मुंबई हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. स्कायमेट हवामान संस्थेने दहा उष्ण शहरांची यादी संकेतस्थळावरून जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील मुंबई व अकोला या दोन शहरांचा समावेश आहे.

ठाण्यात अगदी 23 मार्चपर्यंत रात्री थंडी अन् दिवसा उकाडा अशी स्थिती होती. आता दिवस जो तापतो तो रात्रीही थंड होण्यास तयार नाही.  ठाणे महापालिकेच्या नोंदीनुसार 22 आणि 23 मार्च रोजी कमाल तापमान अनुक्रमे 35 आणि 36 तर किमान तापमान 23 डिग्री सेल्सिअस होते. मात्र 24 मार्च रोजी 36 अंशावरून तापमानात अचानक 4 अंश डिग्री सेल्सिअसने वाढ झाली.

कल्याण-डोंबिवलीत जणू सकाळ उगवतच नाही. उगवतेय ती थेट रणरणती दुपारच!  सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास येथील पार्‍याने पस्तीशी ओलांडली. सकाळी 9.37 च्या दरम्यान कल्याणमध्ये 35.7 डिग्री सेल्सिअसची नोंद झाली. तर दुपारच्या प्रहरात हा पारा 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचला.

Tags : mumbai news, Maharashtra, Temperature, Increases,


  •