Fri, May 24, 2019 03:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रालयासमोर मनसेचे ‘खड्डे निर्माण’

मंत्रालयासमोर मनसेचे ‘खड्डे निर्माण’

Published On: Jul 18 2018 2:18AM | Last Updated: Jul 18 2018 2:03AMमुंबई : प्रतिनिधी 

राज्यात ऐन पावसाळ्यात रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र संबंधित पालिका प्रशासन तसेच राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. महापौर, तसेच संबंधित मंत्री एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत मंगळवारी पहाटे मंत्रालयासमोरील रस्ता खोदून सरकारचा निषेध नोंदविला.

मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सायन-पनवेल महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून या रस्त्याने प्रवास करणार्‍यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांतून प्रवास करताना सर्वसामान्यांना होणारा त्रास, नागरिकांचे जाणारे जीव या सर्वाची जाणीव सरकारला व्हावी यासाठी मंत्रालयावर सर्जिकल स्ट्राईक आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला होता. 

मंगळवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास मनसे कामगार सेना उपसचिव रमेश ओव्हाळकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत हातात कुदळ-फावडे घेऊन रस्ता खोदून टाकण्याचा प्रयत्न केला. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सर्वसामान्य जनतेला होणार्‍या त्रासाची सरकारला जाणीव व्हावी यासाठीच मंत्रालयासमोरील रस्ता खोदण्यात आला. या आंदोलनाची दखल घेऊन लवकरात लवकर खड्डे बुजवा अन्यथा गाठ मनसेशी आहे, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान या प्रकरणी मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना मरिन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली आहे.