Wed, Nov 21, 2018 05:38



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्राईम टाईमसाठी खळ्ळखट्याक

प्राईम टाईमसाठी खळ्ळखट्याक

Published On: Dec 21 2017 2:10AM | Last Updated: Dec 21 2017 1:46AM

बुकमार्क करा





मुंबई : प्रतिनिधी 

मुंबईसह राज्यातील ज्या सिनेमागृहांमध्ये मराठी चित्रपटांना प्राईम टाईम शो दिला जाणार नाही त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने केली आहे. जे थिएटर असे करणार नाहीत त्यांच्याविरोधात खळ्ळखट्ट्याक कारवाई करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. पक्षाच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत हा इशारा दिला. यावेळी ‘देवा’ या मराठी चित्रपटातील अभिनेता अंकुश चौधरी आणि अन्य कलाकार उपस्थित होते. 

देवा या चित्रपटाला प्राईम टाईम शो मिळत नसल्याने मनसेने पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला आहे. राज्यात मराठी चित्रपटांना प्राईम टाईम शो देणे बंधनकारक आहे. मात्र असे असतानाही जे थिएटर मराठी चित्रपटाला प्राईम टाईम शो देणार नाही त्यांचा परवाना रद्द करावा अशी मागणी खोपकर यांनी केली. शुक्रवारी ‘देवा’ हा मराठी चित्रपट व ‘टायगर जिंदा है’ हा हिंदी चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित होत आहेत. टायगर हा बिगबजेट चित्रपट असल्याने त्याचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग देखील सुरू झाले असून 1500 ते 2500 रुपयांपर्यंत त्याचे तिकीट विकले जात आहे. 

‘टायगर जिंदा है’चे निर्माते असलेल्या यशराज फिल्म्सची मुजोरी आम्ही चालवून घेणार नाही. यशराज फिल्म्सच्या चित्रपटांचे शुटिंग राज्यात होते हे त्यांनी विसरु नये, असा इशारा त्यांनी दिला. मुजोरीला उत्तर देणे आम्हाला चांगल्या प्रकारे येते. त्यामुळे चर्चेतून प्रश्न सुटला तर ठीक आहे, अन्यथा महाराष्ट्रात यशराजची शूटिंग होऊ देणार नाही, असा इशारा खोपकर यांनी दिला.

आमचा विरोध टायगर चित्रपटाला किंवा हिंदी चित्रपटाला नसून त्यांच्या दादागिरीला आहे. महाराष्ट्रात मराठी चित्रपटाला प्राईम टाईम शो मिळावा यासाठी भीक मागावी लागते ही लाजीरवाणी परिस्थिती आहे, असे ते म्हणाले. राज्यात मराठी चित्रपटांनाच प्राधान्य मिळायला हवे. यासाठी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली.