होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महामंडळांवरील नियुक्त्यांना अखेर मुहूर्त

महामंडळांवरील नियुक्त्यांना अखेर मुहूर्त

Published On: Apr 18 2018 2:01AM | Last Updated: Apr 18 2018 1:50AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

महिनाअखेरीस राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असताना महामंडळाच्या रिक्त जागाही भरल्या जाणार आहेत. सोमवारी सायंकाळी भाजपच्या कोअर टीमच्या बैठकीत महामंडळाच्या रिक्त जागा भरण्यावर चर्चा झाली आहे. येणारी लोकसभा निवडणूक पहाता सांगलीतील पक्षाचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रदेश विस्तारित कार्यकारिणीची बैठक ही सांगलीत घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

राज्य सरकारला साडेतीन वर्ष पूर्ण झाली असून लवकरच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. मात्र, अजूनही महामंडळाच्या रिक्त जागा भरण्यात आलेल्या नाहीत. या रिक्त जागा भरण्याबाबत भाजपच्या कोअर टीमच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, वित्तमंत्री सुधीर  मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. भाजपच्या प्रदेश संघटनमंत्रीपदाची जबाबदारी विजय पुराणिक यांच्याकडे सोपविण्यात आली असून ते देखील या बैठकीला उपस्थित होते. 

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपच्या विस्तारीत कार्यकारिणीची बैठक मे महिन्यात घेतली जाणार आहे. ही बैठक सांगली येथे घेण्यावर एकमत झाले आहे. सांगली लोकसभा ही काँग्रेसची पारंपरिक जागा भाजपने गेल्या निवडणुकीत जिंकली. तसेच सांगलीत आठ जागांपैकी चार आमदारही निवडून आले. त्यामुळे हा गड शाबूत राखण्यासाठी विस्तारित कार्यकारिणी सांगलीत घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

Tags : Mumbai, Maharashtra, Ministry Extension, will be soon, Mumbai news,