Sun, Jul 21, 2019 16:19
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजप, शिवसेनेची बाजी!

भाजप, शिवसेनेची बाजी!

Published On: May 24 2018 9:28AM | Last Updated: May 24 2018 4:31PMमुंबई : खास प्रतिनिधी

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणार्‍या सहापैकी पाच जागांचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. शिवसेनेने आश्‍चर्यकारकपणे मुसंडी मारत दोन जागा पटकावल्या, तर भाजपने दोन आणि राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळवला. काँग्रेसला मात्र एकाही जागेवर विजय मिळू शकला नाही. दरम्यान, नाशिकमध्ये शिवसेनेला भुज‘बळ’ लाभल्याचे बोलले जात आहे.

अमरावतीत तर काँग्रेेसची 128 मते असताना त्यांच्या उमेदवाराला अवघी 17 मते मिळाली, तर भाजपचे राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी 458 मते मिळवून मोठाच विजय मिळवला. देशभरात भाजपविरोधकांची मोट बांधत देशाची सत्ता मिळवण्याची स्वप्ने पाहणार्‍या काँग्रेसला हा मोठाच धक्‍का आहे.

नाशिक : सेनेला भुजबळांची रसद

नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना असा सामना रंगला असताना शिवसेनेने बाजी मारून विजय मिळवला. सेनेचे नरेंद्र दराडे यांनी सुमारे 200 मतांची आघाडी घेत, राष्ट्रवादीवर दणदणीत विजय मिळवला. दराडे यांना 412, तर राष्ट्रवादीच्या शिवाजी सहाणे यांना 219 मते मिळाली. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची शिवसेनेला नाशिकमध्ये मदत झाल्याची चर्चा आहे.

रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुलाला, अनिकेत तटकरे यांना रिंगणात उतरवले होते. शिवसेनेचे राजीव साबळे यांचा तीनशेहून अधिक मतांनी सडकून पराभव करीत अनिकेत तटकरे यांनी परिषदेत प्रवेश केला आहे. अनिकेत यांना 620, तर साबळेंना 306 मते मिळाली.

परभणी-हिंगोली मतदार संघात शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांनी 35 मतांची आघाडी घेताना 256 मते मिळवत विजय मिळवला. काँग्रेसचे सुरेश देशमुख यांच्या पदरात 221 मते  पडली. वर्धा - चंद्रपूर - गडचिरोलीमधून भाजपच्या रामदास आंबटकर यांनी 88 मतांनी विजय मिळवला. आंबटकर यांना 528 मते, तर काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांना 491 मते मिळाली.

बीड - लातूर - उस्मानाबाद या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील निकाल निवडणूक आयोगाने राखून ठेवला आहे.

निकाल सविस्तर -   

परभणी-हिंगोली  

शिवसेना - विप्लव बाजोरिया (२५६ मतं)
काँग्रेस - सुरेश देशमुख (२२१ मतं)
शिवसेना ३५ मतांनी विजयी

नाशिक  
शिवसेना - नरेंद्र दराडे (४१२ मतं)
राष्ट्रवादी - शिवाजी सहाणे (२१९ मतं)
 शिवसेना १९३ मतांनी विजयी

अमरावती
भाजपा - प्रविण पोटे-पाटील (४५८ मतं)
काँग्रेस - अनिल मधोगरिया (१७ मतं)
 भाजप ४४१ मतांनी विजयी

 कोकण 
राष्ट्रवादी - अनिकेत तटकरे (४२१ मतं)
शिवसेना - राजीव साबळे (२२१ मतं)
राष्ट्रवादी २०० मतांनी विजयी

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली 
भाजपा - रामदास आंबटकर (५५० मतं)
काँग्रेस - इंद्रकुमार सराफ (४६२ मतं)
भाजप ८८ मतांनी विजयी