Fri, Apr 26, 2019 17:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 25 एकर जागा, मंत्रिमंडळाचा निर्णय

साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 25 एकर जागा, मंत्रिमंडळाचा निर्णय

Published On: May 29 2018 4:59PM | Last Updated: May 29 2018 4:59PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विभागाची 25 एकर जागा कायमस्वरुपी देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळात घेण्यात आला. या निर्णयामुळे गरिब आणि गरजू रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक असलेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाही या निर्णयामुळे फायदा होईल.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या दृष्टीने अनेक निर्णय घेण्यात आले. यात सैनिकी शाळेतील शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्नही सोडवण्यात आला आहे. तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने राज्यातील तीन सैनिक शाळेतील 36 शिक्षक पदांना अनुदान देण्याचा मंजूरी मिळाली. यात वाशिम जिल्ह्यातील यशवंतराव सैनिक शाळा, बुलढाण्यातील राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि यवतमाळमधील स्वर्गीय ईश्वर देशमुख सैनिक शाळेचा समावेश आहे. 

मंत्रिमंडळातील इतर निर्णय 

- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जमीन खरेदीसाठीच्या आर्थिक व्याप्तीत वाढ.
-  मुंबई महापालिका, महाराष्ट्र महापालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती,औद्योगिक नगरी अधिनियमात अनधिकृत बांधकामावरील शास्तीच्या तरतुदीत सुधारणा.
- साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाची 25 एकर जागा कायमस्वरूपी मिळणार 
- चक्रीवादळ, भूकंप, आग, पूर,त्सुनामी, गारपीट, दुष्काळ इत्यादी नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी तत्काळ मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन.
- अधिकाधिक तरूण सैन्यदलात यावेत यासाठी सैनिकी शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन सैनिकी शाळेतील 36 शिक्षक पदांना अनुदान.
- नागरी स्वराज्य संस्थांमधील अन्न निरीक्षकांची 33 पदे आता अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून अन्न-औषधी प्रशासनाकडे वर्ग.
- ऊर्जा विभागाच्या आस्थापनेवर मुख्य विद्युत निरीक्षक हे विभागप्रमुखाच्या वेतनश्रेणीतील पद निर्माण करण्यास मान्यता.
-  राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत हंगाम 2016-17 मध्ये खरेदी केलेल्या तुरीची विक्री करण्याबाबतच्या धोरणास मान्यता.
- नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग (महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) प्रकल्पासाठी सवलत करारनाम्यास मान्यता.