Wed, Jun 03, 2020 00:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ अखेर बंद

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ अखेर बंद

Last Updated: Feb 27 2020 2:50AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी फडणवीस सरकारने सुरू केलेले महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (एमआयईबी) बंद करण्यात येत असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत केली. या निर्णयाद्वारे महाविकास आघाडी सरकारने मागील सरकारचा आणखी एक निर्णय फिरवला.

शिवसेनेचे आमदार विलास पोतनीस यांनी या विषयावर लक्षवेधी मांडली होती. या विषयाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत डॉ. रणजित पाटील, डॉ. सुधीर तांबे, शरद रणपिसे, कपिल पाटील, प्रकाश गजभिये, सतीश चव्हाण, निरंजन डावखरे, महादेव जानकर, भाई गिरकर यांनी सहभाग घेतला. याला उत्तर देताना शिक्षणमंत्री गायकवाड बोलत होत्या.

मंत्री गायकवाड म्हणाल्या की, राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला समान, गुणवत्तापुर्ण आणि आजच्या काळाशी सुसंगत असे शिक्षण मिळावे ही राज्य सरकारची भूमिका आहे. राज्यातील सुमारे 83 शाळांना महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता मिळाली आहे. यात शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये राज्यातील 13 जिल्हा परिषद शाळांना संलग्नता देण्यात आली तर शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये जिल्हा परिषद, नगरपरिषद व महानगरपालिकेच्या शाळा, खासगी अनुदानित शाळा, तसेच स्वयंअर्थसहाय्यित (सेल्फ फंडेड) शाळा अशा एकून 70 शाळांची निवड करण्यात आली. मात्र या सर्व प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्यासंदर्भातील अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या नव्या अभ्यासक्रमाची निश्‍चित रुपरेखाही तयार करण्यात आली नव्हती. या सर्व त्रुटी लक्षात घेता विद्यार्थ्यांचे हित अबाधित राखत संबधित शाळेतील अभ्यासक्रम पुर्वी प्रमाणेच चालू ठेऊन आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करत असल्याची घोषणा वर्षा गायकवाड यांनी सभागृहात केली. या मंडळात संलग्न झालेल्या सर्व 83 शाळा सुरूच राहतील, असेही शिक्षणमंर्त्यांनी स्पष्ट केले.

हा राजकीय द्वेष : दरेकर

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले की, मागील सरकारने एमआयईबी हे मंडळ एका चांगल्या उद्देशाने आणले होते. जिल्हा परिषद व महानगरपालिका शाळांत शिकणार्‍या सर्वसामान्य व गरीब मुलांना सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे हा यामागचा हेतू आहे. हे मंडळ स्थापन करताना काही त्रुटी राहिल्या असतील. काही चुकीच्या गोष्टी त्यात असतील तर त्या दुरुस्त करा. तसेच गरजेनुसार सुधारणा करा पण हे मंडळ बंद करू नये अशी आमची मागणी आहे. हे सरकार मागील सरकारने केलेल्या कामांना स्थगिती देत चालले आहे किंवा योजना बंद करत आहे. हे राजकीय द्वेषापोटी केले जात असून, ते योग्य नाही.

हा करंटेपणा : तावडे

महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ रद्द करून या सरकारने ग्रामीण भागातील मराठी विद्यार्थ्यांच्या मोठा अडथळा निर्माण केला आहे. 10 वी पर्यंत मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय करतांना महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ रद्द करणे हे अतिशय करंटेपणाचे असल्याची प्रतिक्रीया माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलीआहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण केवळ उइडए, खउडए, खॠउडए, खइ च्या माध्यमातूनच घेतले पाहिजे असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटते का? असा सवालदेखील तावडे यांनी केला आहे.