Tue, Jul 16, 2019 00:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वारीत हिंसेचा कट; मुख्यमंत्र्यांचा महापूजेला न जाण्याचा निर्णय(Video)

वारीत हिंसेचा कट; मुख्यमंत्र्यांचा महापूजेला न जाण्याचा निर्णय(Video)

Published On: Jul 22 2018 2:19PM | Last Updated: Jul 22 2018 2:28PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

पंढरपुरात काही संघटनांकडून हिंसाचार घडविण्याचा कट रचला जात आहे. मला संरक्षण आहे परंतु १० लाखांहून अधिक वारकर्‍यांच्या सुरक्षेचा विचार करून मी महापूजेला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. मला विठ्ठलाच्या पूजेपासून कोणीही रोखू शकत नाही. मी घरी विठ्ठलाची पूजा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्‍थितीत शासकीय महापूजा होणार नसून पूजा वारकर्‍याच्या हस्‍ते होणार आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि जिल्‍हाधिकारी यावेळी केवळ उपस्‍थित राहणार आहेत. 

पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महापुजेला मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहू देणार नाही असे म्हणत सकल मराठा समाजाच्यावतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली होती. लोकांच्या भावनेचा विचार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूजेला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली होती. त्यानंतर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारीला गालबोट लागू नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे सांगतिले. यावेळी त्यांच्याबरोबर चंद्रकांत पाटील उपस्‍थित होते.

मला विठ्ठलाच्या पूजेपासून कोणीही रोखू शकत नाही

विठ्ठलाच्या पुजेपासून मला कोणीही रोखू शकत नाहीत. माझ्याही घरी विठ्ठल आहे मी पुजा करु शकतो. तसेच माझ्याभोवती सुरक्षा व्यवस्था आहे. त्यामुळे मला कोणीही हात लावू शकत नाहीत. मात्र, लोकांच्या भावनेचा आणि वारीत येणाऱ्या १० लाखांहून अधिक वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मी विठ्ठलाच्या महापुजेला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

आरक्षण न्यायालयातच मिळणार, भरती रद्द नाही

राजकीय हेतूने काही संघटनांकडून लोकांना चिथवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरक्षण केवळ न्यायालयातूनच मिळू शकते. स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्या लोकांचा बुरखा अशा प्रकारातून फाटला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच मेगा भरतीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळेल. यामध्ये तत्वता आरक्षण देण्यात येणार असून न्यायालयाकडून आरक्षण मिळाल्यानंतर पुढे भरती प्रक्रिया त्यानुसार राबवली जाईल. मात्र मेगाभरती रद्द करता येणार नाही. रद्द केल्यास इतरांचे नुकसान तर होईलच मात्र मराठा समाजातील मुलांचेही नुकसान होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वारकर्‍यांना त्रास देणारे छत्रपतींचे मावळे असू शकत नाहीत

मराठा समाजाचे आंदोलन करणारे वारकऱ्यांना त्रास देणार नाहीत. वारकऱ्यांना वेठीस धरणारे छत्रपतींचे मावळे असूच शकत नाहीत असे मुख्यमंत्री म्हणाले. वारकऱ्यांना वेठीस धरुन अशा मागण्या करणे चुकीचे आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा आमच्या सरकारने लावून धरला आहे. उच्च न्यायालयाच्या सांगण्यानुसार मागासवर्गीय आयोगाने शिफारस केल्यानंतर याबाबत न्यायालयच निर्णय देईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.