Wed, Jul 17, 2019 16:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एकनाथ खडसेंचे पंख छाटण्याच्या हालचाली

एकनाथ खडसेंचे पंख छाटण्याच्या हालचाली

Published On: Aug 29 2018 2:00AM | Last Updated: Aug 29 2018 1:47AMमुंबई : चंदन शिरवाळे

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील शीतयुध्द आता अधिक तीव्र झाले असून खडसेंच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत रक्षा यांच्याऐवजी आपली पत्नी  आणि जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांना उमेदवारी मिळवण्यासाठी महाजन आटोकाट प्रयत्नशील असल्याचे समजते. 

पुण्यातील एमआयडीसीच्या जमीनखरेदी प्रकरणात गैरव्यवहार केल्याचा आरोप झाल्यानंतर खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांची चौकशी सुरू झाली. आपल्या या अवस्थेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कारणीभूत असून त्यांना गिरीश महाजन यांची साथ असल्याचा पक्का समज झाल्याने खडसेंनी सातत्याने सरकारला अडचणीत आणणारी विधाने केली. त्यामुळे आता त्यांच्या घरातून सत्तेची पदे हिसकावून घेण्यासाठी महाजन यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. खडसे यांच्या स्नुषा रक्षा निखिल खडसे यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळू नये, अशी रणनीती आखली जात असल्याचे समजते. गिरीश महाजन आपल्या पत्नीलाच लोकसभेची उमेदवारी मिळवून देण्याच्या प्रयत्नात असल्याचे भाजपातील सूत्रांनी सांगितले. 

जळगाव जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघांपैकी भाजपचे गिरीश महाजन (जामनेर) संजय सावकारे (भुसावळ), हरीभाऊ जावळे (यावल), एकनाथ खडसे (मुक्ताईनगर) तर चोपडामध्ये शिवसेनेचे चंद्रकांत सोनवणे आमदार आहेत. महाजन यांचा जामनेर विधानसभा मतदार संघ रावेर लोकसभा मतदार संघात आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरीषदेच्या निवडणुकीत महाजन यांनी सर्वच म्हणजे 25 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणले होते.

सध्या साधना महाजन या जामनेरच्या नगराध्यक्षा आहेत. निवडणुकीच्या राजकारणात जळगाव जिल्ह्यात गुजर व लेवा पाटील या दोन समाजाचे निर्णायक मतदान राहीले आहे. साधना महाजन आणि खासदार रक्षा खडसे या गुजर समाजाच्या आहेत. तिकीट नाकारल्यास रक्षा यांनी बंडखोरी केली तरी त्याचा भाजपलाच फायदा होईल, अशी चर्चा आहे.  भाजपने खडसेंना साईड ट्रॅक केल्यानबंतर महाजन यांचे पक्षातील वजन वाढले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव आणि नाशिक महानगरपालिका तसेच पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीची जबाबदारी महाजन यांच्यावर सोपविली होती. या तिन्ही निवडणुकांमध्ये महाजन यांनी पक्षाला नेत्रदिपक यश मिळवुन दिले आहे.  शेतकरी मोर्चा, मराठा आरक्षण आंदोलक, केरळ पुरग्रस्तांना मदत वाटपाची मुख्यमंत्र्यांनी सोपविलेली जबाबदारीही त्यांनी यशस्वी पार पाडली आहे. त्यामुळे रक्षा खडसे यांच्या ऐवजी साधना महाजन यांना रावेरमधुन उमेदवारी देण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरु झाल्याचे समजते. त्यामुळे खडसे समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. हे समर्थक द्विधा  मनस्थितीत असल्याचे समजते.