Mon, Jul 22, 2019 04:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्वखर्चाने साकारली पाणीपुरवठा योजना!

यशोगाथा : स्वखर्चाने पोहोचवले प्रत्येक घरात पाणी

Published On: Mar 23 2018 11:09AM | Last Updated: Mar 23 2018 11:09AMधसई : वार्ताहर

एप्रिल महिन्यात विहीरीने तळ गाठला की दरवर्षी मुरबाड तालुक्यातील महाज गावातील 21 कुटुंबांवर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ येत असे. अनेक वेळा रोजगार बुडवून केवळ दोन हंडे  पाण्यासाठी सहा तासांची पायपीट करावी लागत होती. मात्र, दरवर्षीची ही पायपीट टाळण्यासाठी या कुटुंबांनी अनोखा निर्धार केला.

प्रत्येक कष्टकरी कुटुंबाने पोटाला चिमटा काढत वर्षभरात  सुमारे 2 लाख  40 हजार जमा केले. या पैशांतून त्यांनी बोअरिंग खोदून सुमारे 1 किलोमीटरवरून पाईपद्वारे प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याची  किमया साधली. यासाठी कोणतीही सरकारी मदत न घेता आपल्या  गावावरील पाणीटंचाईचा शिक्का महाज ग्रामस्थांनी दूर केला.  ठाणे जिल्ह्याच्या डोंगराळ व दुर्गम भागात दरवर्षी तीव्र पाणीटंचाई जाणवते. जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणावर नागरिकरण होत असताना, खेड्यांमधील ग्रामस्थांना किमान सुविधांसाठीही  संघर्ष करावा लागतो.

मुरबाड शहरापासून सुमारे 32 किलोमीटरवरील महाज गावाचीही  अशीच अवस्था आहे. गावाबरोबरच नजीकच्या पाड्यांना  भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. महाजजवळच्या एका पाड्यावर 21 कष्टकरी कुटुंबांची उन्हाळ्यात फरफट होत असे. सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह मोलमजुरीवर होतो.  विशेषतः उन्हाळ्यात काम  सोडून घरातील एका सदस्याला पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागत असे.

या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा या कुटूंबांनी निर्धार केला. काही जणांनी सरकारी मदत मागण्याचा विचार बोलून दाखविला.  मात्र, सरकारी मदत मिळेपर्यंत उशीर झाल्यास पाण्यासाठी फरफट सुरूच  राहण्याची भीती होती. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने पदरमोड करीत पैसे जमविण्याचा निर्धार केला. अखेर वर्षभरानंतर  प्रत्येक घराने 20 हजार रुपये जमा केले. त्यांनी समाजसेवक विठ्ठल म्हाडसे यांच्याशी संपर्क साधला. म्हाडसे यांनी मदतीची तयारी दर्शवून कमीत कमी खर्चात पाण्याचा शोध सुरू केला. त्यानुसार पाड्यापासून काही अंतरावर बोअरिंग खोदण्यात आली. मात्र, त्यात अपयश आले. त्यात पाऊण  लाखाची पुंजी वाया गेल्यावरही ग्रामस्थ खचले नाहीत. त्यांनी नव्या उमेदीने दुसरी जागा पाहण्यास सांगितले. अखेर अवघ्या एका किलोमीटरवर योग्य जागा सापडली. तेथे बोअरिंगला पाणी लागल्यावर  ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अखेर पाणीटंचाईतून मुक्तता झाल्याचा आनंद साखर वाटून गावकर्‍यांनी व्यक्त केला. महाजवासीयांचे कौतुक महाजमधील ग्रामस्थांनी स्वखर्चाने साकारलेला पाणीपुरवठा प्रकल्प पाहण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटनही करण्यात आले. पवार यांनी ग्रामस्थांच्या या स्तुत्य  उपक्रम आणि धाडसाबद्दल कौतुक केले. या वेळी माजी आमदार  गोटीरामही पवार उपस्थित होते.

पाणी बचतीचा मंत्र

सुमारे एक किलोमीटरवरील बोअरिंगवरून पाड्यापर्यंत कमीत कमी खर्चात पाईपलाईन टाकण्यात आली. त्यानंतर प्रत्येक घरात नळही देण्यात आला. गुढीपाडव्यापासून गावात अखंडित पाणीपुरवठा सुरू  झाला आहे. मात्र, पाणीटंचाईचे चटके सोसलेल्या ग्रामस्थांनी पाण्याची उधळपट्टी न करता पाणीबचतीचा मंत्र घेत जपून पाणी वापरण्याचा निर्धार केला आहे. 
 

Tags : Water System Project, Government, Mahaj, Villagers, Success Story