Sat, Apr 20, 2019 18:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चार हजारांची लाच घेताना मंडल निरीक्षक जाळ्‍यात

चार हजारांची लाच घेताना मंडल निरीक्षक जाळ्‍यात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

महाड प्रतिनिधी  

वडिलांच्या जमिनीवर आईचे नाव वारस म्हणून नोंद करण्याच्या कामासाठी महाड मंडल निरीक्षक शहाजी पांडुरंग भुजबळ यांनी तक्रारदाराकडे ४ हजारांची लाच मागितली. याप्रकरणी आज रायगड विभाग लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने  सापळा रचून केलेल्‍या कारवाईमध्ये या मंडल निरीक्षकास आज सोमवार दुपारी दीड च्या सुमारास रंगेहात अटक केली.

या संदर्भात प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाड तालुक्यातील ईसाने कांबळे गावातील तक्रारदार आपल्या वडिलांच्या मालकीच्या असलेल्या जमिनीवर आईचे नाव वारस म्हणून नोंद करण्यासाठी मंडल निरीक्षक  भुजबळ यांच्याकडे गेले होते. यावेळी भुजबळ यांनी ही नोंद करण्यासाठी १० हजार रूपयांची लाच दिनांक २३ मार्च रोजी मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत विभागास दिली. 

मंडल निरीक्षक भुजबळ यांनी मागितलेल्या १० हजार रुपयांच्या लाचेत अखेर तडजोड होऊन ४ हजार रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले होते. आज २६ मार्च रोजी त्यानुसार मंडल निरीक्षकास त्यांच्या  कार्यालयांमध्ये सदरचे चार हजार रूपये घेताना रायगड विभागाच्या लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी  त्यांना रंगेहात पकडले. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे . 

गेल्या दीड वर्षांमध्ये महाड महसूल विभागातील लाचप्रकरणी पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची संख्या आता तीन झाली असून महाड महसूल खाते भ्रष्टाचार प्रकरणात जिल्ह्यात क्रमांक एकवर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे . 

या कारवाईमध्ये रायगड लाचलुचपत विभागाचे मुख्य अधिकारी जोशी यांच्यासह अन्य चार कर्मचाऱ्यांचा समावेश होता. अटक करण्यात आल्यानंतर मंडल निरीक्षक शहाजी भुजबळ यांना एमआयडीसी विश्रामगृहांमध्ये नेण्यात आले. याठिकाणी त्यांची चौकशी करण्यात आली असुन पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. 

महाड तालुक्यातील महसूल विभागाच्या या कर्मचाऱ्यांच्या अटकेने संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून महसूल खाते पुन्हा एकदा लाचलुपत विभागाच्या रडारवर आल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी  मंडल अधिकाऱ्यांसह संबंधित असणाऱ्या  सर्वांची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Tags : Mahad four thousand rupees bribe case mandal inspector arrest


  •