Mon, Aug 19, 2019 09:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › यामुळे महाड पोलिस 'अलर्टवर' कारण ...

यामुळे महाड पोलिस 'अलर्टवर' कारण ...

Published On: Mar 25 2018 5:00PM | Last Updated: Mar 25 2018 6:25PM महाड : प्रतिनिधी

चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या एटीएस पुणे पथकाने महाड मधून एका बांगलादेशी दहशतवाद्याला अटक केली होती. यानंतर स्थानिक पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून महाड तालुक्यातील बांधकाम व्यावसायिक भंगार विक्रेते व हॉटेल मालकांना आपल्याकडील परप्रांतीय कामगारांच्या याद्या सादर करण्याचे आदेश दिले होते. हे आदेश काल शनिवारी तातडीने बोलवण्यात आलेल्या बैठकांमधून देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

चार दिवसांपूर्वी पुणे येथील महाराष्ट्र शासनाच्या एटीएस पथकामार्फत करण्यात आलेल्या चौकशी दरम्यान पुणे आकुर्डी सह रायगड जिल्ह्यातील महाड व अंबरनाथ या ठिकाणी बांगलादेशी दहशतवाद्यांनी आपले तळ निर्माण केल्याचे उघडकीस आले होते. या संदर्भात महाड तालुक्यांतून एका बांगलादेशी दहशतवादी नागरिकास पकडण्यात या पथकाला यश प्राप्त झाले असून त्याच्याकडून त्याच्या अन्य साथीदारांची चौकशी सुरू झाली आहे. 

प्राथमिक मिळालेल्‍या माहितीनुसार या दहशतवाद्यांकडून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी घातपात करण्याच्या योजना आखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे . वीस वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी येथे घडलेल्या प्रकरणानंतर या वर्षी प्रथमच  महाडमध्ये दहशतवाद्यांनी आश्रय घेतल्याचे निदर्शनास आल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

या पार्श्वभूमीवर महाड पोलिस प्रशासनाने संपूर्ण तालुक्यातील बांधकाम व्यावसायिकदार ,हॉटेल चालक तसेच भंगार विक्रेते यांची तातडीने बैठक बोलवून त्यांच्याकडे काम करणाऱ्या परप्रांतीय विशेष करून बांगलादेशी नागरिकांच्या संदर्भात आधार कार्ड, रेशन कार्डसह शासनमान्य कागदपत्रांची खातरजमा करण्यास सांगण्यात आले आहे. 

या संदर्भात महाड शहर पोलिस ठाण्यास काल सायंकाळी बांधकाम व्यावसायिकदारांची बैठक तातडीने बोलवण्यात आली होती. यामध्ये अशा प्रकारच्या कामगारांची यादी पोलीस प्रशासनाला देण्याबाबतचे निर्देश देण्यात आले असून या सर्व कागदपत्रांची नोंद संगणकांमध्ये करण्याची सूचना देण्यात आली आहे .  

 या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या निर्देशानुसार बांधकाम व्यावसायिक दारांकडून काम करण्यात येणाऱ्या विविध परप्रांतीय कामगारांबाबत अधिक चौकशी करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आगामी काळात महाड परिसरात तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये या विविध व्यवसायातून काम करणारे परप्रांतीय कामगार आता पोलिसांच्या रडारवर आल्याचे मानण्यात येत आहे . 
या संदर्भात रविवारी दैनिक पुढारीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये याबाबतची सविस्तर माहिती घेण्याचे सुचित करण्यात आले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्येही असणाऱ्या विविध कामगार ठेकेदारांकडूनही पोलीस यंत्रणेमार्फत परप्रांतीय कामगारांची यादी त्यांच्या शासनमान्य कागदपत्रांसह देण्याच्या सूचना करण्यात आल्याचे समजते . 

गेल्या दहा वर्षांमध्ये महाड तालुक्यात भंगारव्यवसाय अत्यंत मोठय़ा प्रमाणावर सुरू झाला असून हा प्रामुख्याने परप्रांतीय कामगारांकडून चालविण्यात येतो. याबाबत अधिक चौकशी केली असता या भंगार विक्रेत्यांकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे उघडकीस येऊनही स्थानिक पोलीस प्रशासनामार्फत तसेच ग्रामपंचायतीमार्फत व महसूल प्रशासनामार्फत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही याबाबत नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे . 

बांगलादेशी नागरिकांच्या दहशतवादी कृत्याचा पर्दाफाश करण्यात पुणे एटीएस पथकाला यश प्राप्त झाल्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासनाने गतीने कार्यवाही करीत परप्रांतीय कामगारांच्या ठावठिकाण्याचा तसेच त्यांच्या वास्तव्याबाबत शहानिशा करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे . 

एटीएसच्या पुणे पथकाने चार दिवसांपूर्वी टाकलेल्या या अटक प्रकरणानंतर स्थानिक पोलिस प्रशासन आजही याबाबत कोणतीही माहिती देण्यास तयार नसल्याने आगामी काळात या प्रकरणाचे धागेदोरे अधिक गुंतण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .

Tags : Mahad, four day,pune, ats, team ,arrest, bangladeshi, terrorists, mahad, police, alert