Wed, May 22, 2019 22:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पुरानंतरच्या समस्‍येच्या निराकरणासाठी महाडचे पथक केरळला रवाना 

पुरानंतरच्या समस्‍येच्या निराकरणासाठी महाडचे पथक केरळला रवाना 

Published On: Aug 21 2018 4:50PM | Last Updated: Aug 21 2018 4:52PM महाड : प्रतिनिधी 

गेल्या शंभर वर्षांत प्रथमच झालेल्या महाप्रलयंकारी महापुरामुळे केरळमधील जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. महापुरामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्याकरिता केरळ येथील सर्पमित्र सघटनाच्या आवाहनानुसार महाडमधील सिस्केप व ऑउल्स या संस्थांचे आठ जणांचे सर्पमित्र संघटनेचे पथक आज दुपारी केरळकडे रवाना झाले आहे. छत्रपती शिवाजी चौकात त्यांना दि. अण्णासाहेब  सावंत बँकेच्या चेअरमन श्रीमती शोभाताई सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. 

गेल्या आठवड्यापासून केरळ राज्यात सुमारे पंधरा  जिल्ह्यांत महाप्रलयंकारी पुरामुळे हाहाकार माजवला आहे. गेल्या दोन दिवसांत यामधील काही जिल्ह्य़ांतून पाणी ओसरू लागल्याचे वृत्त हाती येत असून,  पूर ओसरल्‍यानंतर निर्माण होणार्‍या नवीन संकटांना सामोरे जाण्याकरिता केरळ प्राणी मित्र संघटनेचेजोस लुईस यांनी महाड येथील सर्पमित्र संघटनेला पाचारण केले आहे. 

केरळ राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून पाणी ओसरू लागल्यानंतर विविध भागांमधून विविध जातीच्या सर्प जमिनीतून बाहेर आल्याने नवीन समस्या निर्माण झाल्‍या आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार या संदर्भात काही जिल्ह्यांतून सर्पदंशामुळे  नागरिकांच्या मृत्‍यूच्या घटना घडत असल्‍याचे समोर येत आहे. यामुळे शेकडोंच्या संख्येने विविध भागातून येणाऱ्या सापांवर नियंत्रण ठेवून त्यांना पकडण्याकरिता केरळ प्राणिमित्र संघटनेचे प्रमुख श्री जोस लुईस यांनी महाड येथील सिस्केप व आउल्स या  प्राणीमित्र संघटनेशी संपर्क साधून तातडीने आपले पथक पाठवण्याची विनंती केली. लुईस यांच्या आवाहनानुसार आज सकाळी या दोन्ही  संस्थांचे महाड येथील कार्यकर्ते सर्वश्री चिंतन वैष्णव, योगेश गुरव, चिराग मेहता ,प्रणव कुलकर्णी ,नितीन कदम ,ओंकार वरणकर, यांसह रोहे  येथील दोन कार्यकर्त्यांनी दुपारी नेत्रावती एक्सप्रेसमधून केरळ राज्याकडे प्रयाण केले असून तेवीस तासांच्या प्रवासानंतर ते केरळ राज्यात पोहोचतील असे सागण्यात येत आहे. 

केरळमधील महापुरानंतर गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील रेल्वे प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आज सकाळी नेत्रावती एक्सप्रेस ही  चार दिवसांच्या विश्रांतीनंतर या मार्गावर धावणारी ही पहिली रेल्वेगाडी आहे, यामुळे या राज्यातील जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये असलेली मोठी संख्या लक्षात घेऊन महाडमधील या दोन्ही संस्थेने तातडीने या अत्यावश्यक सेवेसाठी प्रयाण करण्यात आल्‍याची माहिती  या संस्थेचे प्रमुख प्रेमसागर मिस्त्री यांनी दिली आहे . 

या संदर्भात केरळ येथून लुईस यांच्याशी रात्री उशिरा झालेल्या चर्चेनंतर तातडीने पथक पाठवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्राप्त होताच दी अण्णासाहेब सावंत बँकेच्या चेअरमन श्रीमती शोभाताई सावंत यांनी तातडीने  या पथकातील युवकांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाड शहरात गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पाउस सुरू असून, या युवकांना छत्रपती शिवाजी चौकात  भर पावसामध्ये शुभेच्छा देण्यासाठी श्रीमती सावंत स्वतः उपस्थित होत्या . 

 यावेळी श्रीमती सावंत यांनी महाडमधील या आठ जणांच्या युवकांनी स्वीकारलेल्या जबाबदारीचे कौतुक करून आपल्या देशवासियांवर आलेल्या संकटाप्रसंगी धावून जाण्याचा महाडमधील नागरिकांचा असलेला इतिहास भावी पिढीनेही पुढे सुरू ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या संकटकाळी अत्यावश्यक असणाऱ्या सर्व गरजांची पूर्तता करण्यासाठी महाडकर नागरिकांकडून सर्व सहकार्य देण्याची ग्वाही दिली आहे . 

काल रात्री मिळालेल्या अल्पशा सुचने नंतर या आठ जणांच्या चमूसाठी जनकल्याण रक्तपेढी महाड  तसेच  औषध विक्रेते अभय कामत,उदयशेट फुटाणकर यांसह सिस्केप संस्थेचे सागर मिस्त्री व  आउलस संस्थेचे गणेश मेहेंदळे यांनी तातडीने व्यवस्था करून या   केरळच्या प्रवासासाठी तसेच सर्पमित्र संघटनेच्या अत्यावश्यक असणार्‍या गरजांची पूर्तता केली .  यावेळी महाड शहर शिवसेना उपशहर प्रमुख मंगेश देवरुखकर यांनी या युवकांच्या चमूला शुभेच्छा दिल्या.