Wed, Jun 26, 2019 11:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरच्या विमान कारखान्याचे मॅग्नेटिक टेक ऑफ

पालघरच्या विमान कारखान्याचे मॅग्नेटिक टेक ऑफ

Published On: Feb 20 2018 2:02AM | Last Updated: Feb 20 2018 2:00AMमुंबई : प्रतिनिधी 

सातारच्या मराठमोळ्या कॅप्टन अमोल यादव यांना तब्बल आठ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर स्वदेशी बनावटीचे विमान बनवण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. मॅग्‍नेटिक महाराष्ट्रमध्ये यादव यांच्यासोबत सरकारने 35 हजार कोटींचा सामंजस्य करार केला असून पालघरनजीक 157 एकर जमीनदेखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे देशांतर्गत विमान निर्मितीचे स्वप्न पाहणार्‍या यादव यांचे विमान आता प्रत्यक्षात उड्डाण करू शकेल. 

आज झालेल्या सामंजस्य कराराद्वारे यादव यांना विमाननिर्मिती कारखान्यासाठी पालघर जिल्ह्यात 157 एकर जमीन एमआयडीसीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा कारखाना तसेच त्यासाठी पूरक उद्योगांमुळे किमान 10 हजार जणांना रोजगार मिळेल,     असा विश्‍वास यादव यांनी व्यक्‍त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार झाला. राज्यातील विभागीय क्षेत्रांना हवाई मार्गाने जोडण्यासाठी देशी बनावटीच्या छोट्या विमानांचा चांगला उपयोग होईल, असे पहिले 19 आसनी विमान येत्या चार ते सहा महिन्यांतच उड्डाण करू शकेल, असा विश्‍वास यादव यांनी व्यक्‍त केला.

सामंजस्य करार होण्यापूर्वीच आम्ही राज्यातील विभागीय कनेक्टिव्हिटीसाठी विमान तयार करण्याचे काम सुरू केले होते. त्यामुळे विमान निर्मिती प्रक्रिया सध्या वेगात सुरू आहे. प्रत्यक्षात विमान तयार झाल्यावर त्याला उड्डाणासाठी विविध परवानग्यांची आवश्यकता असते. त्यामुळे या परवानग्या मिळण्यासाठी आवश्यक कालावधी संपल्यानंतर व परवानग्या मिळाल्यावर हे विमान त्वरित उड्डाण करू शकेल, असे यादव यांनी स्पष्ट केले.