Thu, Apr 25, 2019 13:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मध्य प्रदेश ते महाराष्ट्र : अन्‍नदात्याचा वर्षभर आक्रोश

मध्य प्रदेश ते महाराष्ट्र : अन्‍नदात्याचा वर्षभर आक्रोश

Published On: Mar 13 2018 1:42AM | Last Updated: Mar 13 2018 1:42AMमुंबई : प्रतिनिधी

तब्बल 200 किलोमीटरची पायपीट करून नाशिकहून मुंबईत धडकलेल्या राज्यातील शेतकर्‍यांच्या लढ्याची दखल देशपातळीवर घेण्यात आली. मात्र, गेल्या वर्षभरातील शेतकर्‍यांचे हे पहिलेच आंदोलन नाही. महाराष्ट्राशिवाय मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आदी राज्यांतील शेतकर्‍यांना आपल्या हक्‍कांसाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे. अशा काही प्रमुख आंदोलनांचा हा आढावा.

मध्य प्रदेश 

जून 20107 मध्ये मध्य प्रदेशातील मंदसौर येथील आंदोलनही असेच गाजले. दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी, उत्पादनाला रास्त भाव मिळावा, या प्रमुख मागण्या होत्या. 1 जून रोजी संतप्‍त शेतकर्‍यांनी आपली उत्पादने आणि दूध रस्त्यावर ओतले. बाजारपेठेत जाणारे ट्रक अडवण्यासाठी महामार्ग बंद पाडले. या आंदोलनामुळे मुंबईतही भाजीपाल्याचे दर कडाडले होते. पिपालिया भागात या आंदोलनाला हिंसक वळण लागले. 6 जून रोजी पोलिसांशी झालेल्या चकमकीत सहा शेतकर्‍यांना आपला जीव गमवावा लागला होता. मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी हमीभावाचे आश्‍वासन दिल्यानंतर 11 जूनला आंदोलन मागे घेण्यात आले. 

महाराष्ट्र 

जून आणि ऑगस्ट महिन्यात राज्यातील नगर जिल्ह्यातून सुरू झालेले शेतकरी आंदोलन नाशिक, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड आणि जळगाव जिल्ह्यातही पसरले. कर्जमाफी,  उत्पादनाला योग्य हमीभाव ही प्रमुख मागणी होती. शेतकर्‍यांनी घाऊक बाजारपेठा बंद पाडल्या. भाजीपाला आणि दूध रस्त्यांवर ओतण्यात आले. रास्ता रोकोही करण्यात आला. याच आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली होती. 

तामिळनाडूच्या शेतकर्‍यांचा ‘दे धक्‍का’ 

एप्रिल आणि जुलै 2017 मध्ये तामिळनाडूतील शेतकर्‍यांनी विविध मागण्यांसाठी थेट दिल्‍लीत धडक दिली. अनोख्या पद्धतीने त्यांनी आपल्या आंदोलनाकडे लक्ष वेधले होते. अर्धनग्‍न अवस्थेतील शेतकर्‍यांनी मानवी कवट्या हातात घेतल्या होत्या. या कवट्यांना फास गुंडाळला होता. शेतकरी  आत्महत्येच्या प्रश्‍नाचे गांभीर्य यातून दाखवण्याचा उद्देश होता. राष्ट्रीयीकृत बँकांची कर्जे माफ करण्याची घोषणा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

राजस्थान 

सप्टेंबर 2017 मध्ये राजस्थानातील शेखावती भागातील शेतकर्‍यांनी दोन आठवडे ठिय्या आंदोलन केले. या शेतकर्‍यांच्या 11 प्रमुख मागण्या होत्या. या आंदोलनादरम्यान शेतकर्‍यांनी राज्यातील विविध भागात रास्ता रोको केले. यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भडकल्या होत्या. 

दिल्‍लीत घुमला आवाज 

नोव्हेंबर 2017 मध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब आणि तेलंगणातील शेतकरी दिल्‍लीतील रामलीला मैदानावर अ. भा. किसान संघर्ष समन्वय समितीच्या झेंड्याखाली एकत्र आले होते. योग्य भाव आणि कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांच्या 184 विविध संघटनांनी हे आंदोलन केले. यावेळी संसदेवरही मोर्चा काढण्यात आला. ‘शेतकरी संसदे’चेही आयोजन करण्यात आले होते. हे आंदोलनही राष्ट्रीय पातळीवर गाजले होते. 

आंध्र प्रदेश 

मिरचीचे भाव गडगडल्याने शेतकर्‍यांनी एप्रिल 2017 मध्ये आंदोलन केले होते. 2016 साली 15 ते 20 हजार रुपये प्रतिक्‍विंटल असलेला मिरचीचा भाव 2017 मध्ये 5 ते 6 हजारपर्यंत खाली आला होता. सरकारने यात मध्यस्थी करण्याची प्रमुख मागणी होती. प्रकाशम जिल्ह्यात अनेक शेतकर्‍यांनी मिरचीचे उभे पीक जाळले होते. नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई देण्याबरोबरच उत्पादन खर्चासाठी कर्जाची मंजुरीही राज्य शासनाने दिली होती.