Sun, Jul 12, 2020 21:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मधू मंगेश कर्णिक यांना विंदा जीवन गौरव पुरस्कार

मधू मंगेश कर्णिक यांना विंदा जीवन गौरव पुरस्कार

Published On: Feb 23 2018 1:52AM | Last Updated: Feb 23 2018 1:52AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा करण्यात येणार्‍या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा विभागाच्या वतीने या वर्षीचा कविवर्य विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मधू मंगेश कर्णिक यांना जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच पुणे येथील वरदा प्रकाशनला श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार, अविनाश बिनिवाले यांना डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार, तर मराठी विज्ञान परिषदेला कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण 

प्रतिष्ठानच्या सभागृहात 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता पुरस्कार प्रदान सोहळा संपन्‍न होणार आहे. या कार्यक्रमात मराठी भाषा विभागाचे सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच मराठी भाषा हे मध्यवर्ती सूत्र असलेला सांगीतिक कार्यक्रमही सादर होणार आहे. तसेच विविध साहित्य प्रकारांचे 35 राज्य वाङ्मय पुरस्कारही प्रदान केले जाणार आहेत. याच कार्यक्रमात गेल्या वर्षभरातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मराठी साहित्यिकांचा विशेष सन्मानही केला जाणार असल्याचेही तावडे यांनी सांगितले. पुरस्कार सोहळ्यादरम्यान सुप्रसिद्ध कलाकार रवींद्र साठे, उत्तरा केळकर यांच्यासह अनेक प्रथितयश कलाकार मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगणारा कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या 15 दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशनही होत आहे.

तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व पुरस्कार विजेत्या साहित्यिकांच्या अभिनंदनाचा ठरावही दोन्ही सभागृहांत 27 रोजीच मांडला जाणार आहे. तसेच या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्येही सकाळ सत्रात 11 वाजता व दुपार सत्रात 4 वाजता मराठी अभिमान गीताचे समूहगायन होणार आहे. सातारा जिल्ह्यातील भिलार या भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावात यंदा मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यात पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासह अनेक प्रथितयश कलाकार सहभागी होत आहेत. महाराष्ट्रातील 11 विद्यापीठांच्या माध्यमातून राज्यातील विविध शहरांत मराठी भाषेची स्थित्यंतरे दर्शविणारे दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम मराठी रसिकांसाठी सादर करण्यात येणार आहेत.

मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव हे मान्यवर साहित्यिकांशी अनौपचारिक संवाद साधतील, असेही तावडे म्हणाले.