Fri, Aug 23, 2019 21:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मधू चव्हाण यांना मुंबई म्हाडाची लॉटरी

मधू चव्हाण यांना मुंबई म्हाडाची लॉटरी

Published On: Sep 01 2018 2:08AM | Last Updated: Sep 01 2018 2:07AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

भाजप शिवसेना युतीतील महामंडळांचा तिढा सुटला असून महामंडळाच्या रिक्त जागांवरील नियुक्त्या शुक्रवारी जाहीर करण्यात आल्या. महत्त्वाची मुंबई म्हाडा आणि सिडको ही दोन्ही महामंडळे ही भाजपकडे आली आहेत. मुंबई म्हाडाच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी आमदार मधू चव्हाण यांची, तर सिडकोच्या अध्यक्षपदी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माथाडी कामगार नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लावून भाजपने राष्ट्रवादीला आणखी एक धक्का दिला. 

महामंडळाच्या रूपाने शिवसेनेनेही आपल्या काही नेत्यांचे पुनर्वसन केले आहे. माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्याकडे मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरीतील शिवसेना आमदार उदय सामंत यांच्याकडे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी तर माजी सनदी अधिकारी शिवसेना उपनेते विजय नहाटा यांना मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापतीपद देण्यात आले आहे. रामटेकमधील माजी आमदार आशिष जयस्वाल यांना शिवसेनेने खनिकर्म महामंडळ दिले आहे. 

गेले अनेक दिवस महामंडळाच्या नियुक्त्या आणि मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती. काही महामंडळांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असल्या तरी अनेक महामंडळाच्या जागा रिक्त ठेवण्यात आल्या होत्या. अखेर शुक्रवारी 19 महामंडळांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. मुंबई म्हाडा आणि सिडकोवर भाजप आणि शिवसेनेही दावा केला होता. मात्र, ही दोन्ही महामंडळे भाजपने आपल्याकडे ठेवली आहेत. प्रशांत ठाकूर यांना मंत्री करण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेलकरांना दिला होता. मंत्रिपद नसले तरी सिडकोच्या रुपाने ठाकूर यांना मंत्रिपदाचा दर्जा मिळणार आहे. मधू चव्हाण यांना पुन्हा एकदा म्हाडाची लॉटरी लागली आहे. ते यापूर्वी युती सरकारच्या काळात म्हाडाचे अध्यक्ष होते. 

माजी आमदार नरेंद्र पाटील हे भाजपच्या संपर्कात आहेत. निरंजन डावखरे यांच्या भाजप प्रवेशानंतर नरेंद्र पाटील यांच्या प्रवेशाची चर्चा होती. त्यांचा अद्यापि थेट प्रवेश झाला नसला तरी त्यांची अण्णासाहेब  पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लावून भाजपने राष्ट्रवादीला आणखी एक धक्का दिला आहे. मराठा समाजासाठी या महामंडळाचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. तर उपाध्यक्षपदी संजय पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  शिवसेनेचे पश्‍चिम महाराष्ट्रातील नेते नितीन बानगुडे पाटील यांची कृष्णाखोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करुन त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काम करणार्‍या ज्योती ठाकरे यांची महिला आर्थिक विकास महामंडळावर शिवसेनेने वर्णी लावली आहे. तर मनसेतून शिवसेनेत आलेले हाजी अराफात शेख यांनाही राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी बसविण्यात आले आहे.