Tue, Apr 23, 2019 18:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भांडारींना मंत्रिपदाचा दर्जा

भांडारींना मंत्रिपदाचा दर्जा

Published On: Apr 28 2018 2:00AM | Last Updated: Apr 28 2018 1:30AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

गेले अनेक दिवस आमदारकीच्या प्रतीक्षेत असलेले प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांची महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना सनियंत्रण समितीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील आदेश शुक्रवारी जारी करण्यात आला. 

राज्यात विविध प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रिया केली जात असून हे भूसंपादन करत असताना जमीनधारकांना वाजवी मोबदला मिळणे आवश्यक आहे. प्रकल्प होत असताना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न हे वर्षानुवर्षे पडून राहातात. त्यामुळे पुनर्वसन प्राधिकरणाची पुनर्रचना करण्यात आली आहे. या प्रधिकरणावर माधव भांडारी यांची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या पदाला मंत्रिपदाचा दर्जाही देण्यात आला आहे. 

राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून माधव भांडारी यांची विधान परिषदेवर वर्णी लावली जाईल अशी चर्चा होती. विधान परिषदेची निवडणूक आली की भांडारी यांच्या नावाची चर्चा सुरू होत होती. मात्र, प्रत्येक वेळी त्यांची संधी हुकली. मात्र, त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देऊन त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. 

राज्यात प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. कोयना प्रकल्प हा त्याचे उदाहरण आहे. प्रकल्पासाठी जमिनी घेताना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन, घरे, आर्थिक मोबदला तसेच नोकर्‍या देण्याची तरतूद आहे. मात्र, अजूनही लाखो प्रकल्पग्रस्त या सुविधांपासून वंचित आहेत.

Tags : Mumbai, mumbai news, Madhav Bhandari, ministerial status,