होमपेज › Mumbai-Thane-Raigad › परिवहन कर्मचाऱ्यांचा सभापतींच्या दालनाबाहेर शिमगा

परिवहन कर्मचाऱ्यांचा सभापतींच्या दालनाबाहेर शिमगा

Published On: Mar 01 2018 4:16PM | Last Updated: Mar 01 2018 4:15PMकल्याण : प्रतिनिधी

गेल्या दोन महिन्यांपासून  परिवहन कर्मचाऱ्यांचे  वेतन थकविल्याने कर्मचाऱ्यांनी परिवहन सभापतींच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. पगार मिळाला नसल्याने परिवहन कर्मचाऱयांनी प्रशासनाच्या विरोधात होळी सणाच्या दिवशी कामगारांनी परिवहन सभापती संजय पावशे यांच्या दालनाबाहेर  शिमगा केला. यावेळी होळी सण कामगारांच्या कुटुंबियांनी कसा साजरा करायचा? असा संतप्त सवाल उपस्थित केला. 

परिवहन कामगार कर्मचारी संघटनेने प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. होळीची सुट्टी नसल्याने महापालिकेचे कामकाज आज सुरु होते. परिवहन सभापती पावशे दालनात येण्यापूर्वीच त्यांच्या दालनाबाहेर कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस जाधव यांनी सांगितले की,‘कामगारांना गेल्या दोन महिन्यापासून पगार मिळालेला नाही. आज होळीसारखा मोठा सण कर्मचाऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने त्यानी कसा साजरा करायचा. त्याच्या घरात पुरणाची पोळी कशी बनेल? असा प्रश्न उपस्थित केला. दररोज परिवहनला साडे पाच लाखाचे उत्पन्न कामगार मिळवून देतात मात्र कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. आज कामगारांनी त्यांचे कर्तव्य बजाविल्यानंतर हे आंदोलन सुरु केले आहे. कामगारांना पगार मिळत नाही तोर्पयत हे ठिय्या आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे.

परिवहनमध्ये जवळपास 550 कामगार कार्यरत आहे. 1999 सालापासून कामगारांची थकीत देणी दिलेली नाहीत. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी चालक व वाहक हे अत्यावश्यक सेवा म्हणून कामावर येतात. त्याचा मोबदला कामगारांना दिला जात नाही. कामगारांचा आरोग्य विमा काढला जात नाही. हा उपक्रम चांगला चालावा. कामगारांना पगार मिळावे यासाठी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. 14 वर्षापासून कंत्रटी कामगार सात ते आठ हजार रुपये पगारावर काम करीत आहेत. अन्य परिवहन उपक्रमात चालक वाहकाला किमान 20 हजार रुपये पगार मिळतो. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमात कमी पगारावर कामगाराना राबवून घेतले जाते. कमी वेतनही वेळेवर दिले जात नाही. दरम्यान थकीत वेतन आणि कर्मचा:याच्या मागील फरकाची रक्कम 4 मार्चच्या आत मिळाली नाही तर परिवहन कामगार बेमुदत चक्का जाम आंदोलन 5 मार्च पासून करतील असा इशारा परिवहन मजदूर युनियनचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी महापालिका प्रशासनास दिला आहे.