Wed, Jul 24, 2019 12:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एमआरआय दुर्घटना : दुरुस्तीसाठी येणार 56 लाखांचा खर्च

एमआरआय दुर्घटना : दुरुस्तीसाठी येणार 56 लाखांचा खर्च

Published On: Feb 11 2018 2:35AM | Last Updated: Feb 11 2018 2:28AMमुंबई : प्रतिनिधी

महापालिकेच्या नायर रुग्णालयातील एमआरआय मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेला आता दोन आठवडे उलटून गेले आहेत, परंतु अजूनही एमआरआय मशीनची दुरुस्ती काही झाली नाही. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार मशीनमध्ये सिलिंडर अडकल्याने मशीनची मोठी हानी झाली आहे. यासाठी फिलिप्स कंपनीच्या अभियंत्यांनी दोन वेळा रुग्णालयात जाऊन मशीनचा तपासणी केली आहे. त्यांच्या अहवालानुसार मशीनच्या दुरुस्तीसाठी अंदाजे 56 लाख रुपये इतका खर्च येणार आहे. तसा प्रस्ताव लवकरच रुग्णालयाकडून तयार केला जाणार आहे.

27 जानेवारी रोजी सायंकाळी राजेश मारु (वय 32) याचा आपल्या नातेवाईक महिलेचा एमआरआय करताना मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला होता. तेव्हापासून ती एमआरआय मशीन बंद ठेवण्यात आली आहे. रुग्णालयात एमआरआयसाठी रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना महापालिकेच्या केईएम, सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. मात्र येथेही पहिल्यापासून एमआरआयसाठी रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात, त्यामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

मशीनच्या दुरुस्तीसाठी आम्ही जे जे करायचे आहे ते सर्व करत आहोत. गुरुवारी फिलिप्स कंपनीचे इंजिनिअर येऊन मशीनची तपासणी करून त्यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार मशीनच्या दुरुस्तीसाठी 56 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. अशातच या कामासाठी टेंडरिंग काढण्यात येणार असून तसा प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात झाली आहे. प्रस्ताव तयार केल्यावर मंजुरीसाठी तो महापालिकेत स्थायी समितीत मांडण्यात येईल, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.