Sun, May 26, 2019 20:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्याचा प्रमोद, डोंबिवलीच्या श्रुतीचे यश 

ठाण्याचा प्रमोद, डोंबिवलीच्या श्रुतीचे यश 

Published On: May 02 2018 5:48PM | Last Updated: May 02 2018 6:03PMमुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक (मुख्य) परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील शिवाजी जाकापुरे 156 गुण मिळवून राज्यात प्रथम आला आहे. ठाण्यातील प्रमोद केदार यांनी 148 गुण मिळवून मागासवर्गीयांमधून पहिला क्रमांक आणि सांगलीच्या शीतल बंडगर यांनी 141 गुण मिळवत महिलामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 7 जानेवारी 2018 रोजी घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेचे निकाल बुधवारी जाहीर झाले. या निकालातून राज्यभरातील विक्रीकर निरीक्षकांच्या 251 पदांसाठी शिफारस करण्यात आली आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक संयुक्‍त (पूर्व) परीक्षेसाठी राज्यभरातून 3 लाख 30 हजार 909 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. या परीक्षेमधून विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेकरिता 4430 उमेदवार अर्हताप्राप्त ठरल्यानंतर जानेवारीमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. 

विकलांग व्यक्‍तीसाठी असलेल्या वयोमर्यादेचा फायदा घेवू इच्छिणार्‍या उमेदवारांनी आरोग्य विभ    ागाच्या शासन निर्णयानुसार नवीन संगणक प्रणालीद्वारे वितरीत करण्यात आलेलेे नवीन  विकलांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असल्याचे आयोगाने म्हटले आहे. 

निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाइलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून 10 दिवसात, आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचेही आयोगाने म्हटले आहे.

डोंबिवली : प्रतिनिधी

सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. डोंबिवलीकर श्रुती कानडे हिने एमपीएससी परीक्षेत सर्वसामान्यांमधून तिसरा क्रमांक पटकावून इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून पहिल्या क्रमांकावर येण्याचा मान मिळविला आहे.

डोंबिवलीच्या पूर्वेकडील गोग्रासवाडीच्या मेघदूत सोसायटीत राहणारी श्रुती हिने डोंबिवलीतीलच टिळकनगर विद्यामंदिरात शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुलुंडच्या वझे-केळकर महाविद्यालयात बीएससी व एमएससी बायोटेक पदवी प्राप्त केली. एमपीएससी करीत असतानाच श्रुती एक्साईज इन्स्पेक्टर परीक्षेतही चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाली. त्यानंतर सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर अर्थात विक्रीकर निरीक्षकपदाच्या परीक्षेतही खडतर परिश्रम केल्यानंतर श्रुतीचा आनंद निकाल लागल्यानंतर गगनात मावेनासा झाला. 

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वसामान्यांमधून ती तिसर्‍या क्रमांकावर उत्तीर्ण तर झालीच, शिवाय मागासवर्गीय विद्यार्थिनींमधून पहिला क्रमांक पटकावण्याचा मान तिला मिळाला. कुडाळ येथे बी.कॉम पदवी घेतलेली तिची आई मीनल या गृहिणी आहेत, तर वडील मनोहर हे पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले आहेत. भाऊ श्रीकृष्ण हा कमांडो म्हणून लष्करात कार्यरत आहे. 

Tags : sales tax inspector, MPSC, Final result