Thu, Nov 15, 2018 22:08



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवरायांचं नाव घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक : राजू शेट्टी 

शिवरायांचं नाव घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक : राजू शेट्टी 

Published On: Jan 25 2018 5:31PM | Last Updated: Jan 25 2018 5:31PM



मुंबई : पुढारी ऑनलाईन

मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकृतीची आज, खासदार राजू शेट्टी यांनी विचारपूस केली. धर्मा पाटील यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेथे जाऊन खासदार शेट्टी यांनी त्यांची भेट घेतली. या वेळी रविकांत तुपकर यांच्यासह धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील देखील उपस्थित होते.

राज्यातील शेतकऱ्यांना मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याशिवाय सरकारला जाग येत नाही, हे या घटनांमधून स्पष्ट होते, अशी खंत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, 'हे सरकार शिवाजी महाराजांचं नाव घेऊन शेतकर्‍यांची फसवणूक करते आहे. भ्रष्टाचार, शेतकऱ्यांविषयी अनास्था आणि दलालांची बजबजपूरी यामुळे हे सरकार सामान्य माणसांसांठी काम करत नसल्याचं ठसठशीत उदाहरण यानिमित्तानं समोर आलं आहे. धर्मा पाटील यांना २०० गुंठे बागायती शेतीसाठी ४ लाख रुपये नुकसान सरकारकडून दिली जात आहे. मात्र, दुसरीकडे त्याच गटातील ७४ गुंठे शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांला १कोटी ८९ लाख रुपये भरपाई मिळत आहेय हे कुठलं शास्त्र सरकारने आणि उर्जामंत्री बावनकुळे यांनी शोधून काढलंय?' 

दरम्यान, धर्मा पाटील यांच्या मुलाने सरकारने दिलेली १५ लाख रुपयांची मदत नाकारलीय. जर सरकारने योग्य मदत दिली नाही तर, बापाने मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. मी दिल्लीत जाऊन आत्महत्या करेन, असा इशाराही नरेंद्र पाटील यांनी दिलाय.