Fri, Jul 19, 2019 17:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेच्या धमक्‍यांना 'राज' यांचा चिमटा

शिवसेनेच्या धमक्‍यांना 'राज' यांचा चिमटा

Published On: Jan 25 2018 8:52AM | Last Updated: Jan 25 2018 8:52AMमुंबई  : पुढारी ऑनलाईन

शिवसेनेच्या सत्तेतून बाहेर पडण्याच्या सततच्या इशाऱ्यांचा धागा पकडत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्‍या व्यंगचित्रातून चिमटा काढला आहे. विशेष म्‍हणजे राज यांनी या आधी अनेक राजकीय नेत्‍यांवर व्यंगचित्रातून टीका केली आहे. परंतु, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हे पहिलेच पण खूपच मार्मीक टीका करणारे व्यंगचित्र काढले आहे. 

राज ठाकरे यांनी बुधवारी हे व्यंगचित्र प्रसिद्ध केले असून, व्यंगचित्रामधून  शिवसेनेच्या सत्ता सोडण्याच्या धमक्यांचा समाचार घेतला आहे. राज यांनी आपल्‍या फेसबुक फेजवर हे व्यंगचित्र प्रसिध्द केले आहे. 

‘परत सांगतो सोडून जाईन’ असे नाव या व्यंगचित्राला दिले असून, यात भाजप नावाची एक व्यक्ती दाखवण्यात आली  आहे. उद्धव ठाकरे भाजप नावाच्या व्यक्‍तिच्या गळ्याला टांगताना दिसत आहेत. ‘सोडू?’ असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत.तर, भाजप नावाची व्यक्ती ‘अहो, पण आम्ही कुठे धरलंय तुम्हाला?’ असे म्हणत आहे. त्यामुळे  उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते सतत सत्‍तेतून बाहेर पडण्याच्या इशाऱ्यांचा राज यांनी अचूक वेध घेतला आहे.  

शिवसेना आणि भाजप यांच्यात केंद्रासह राज्‍यातही युती आहे. मात्र, या युतीमध्ये बेबनाव आल्याने शिवसेनेकडून युती तोडून सत्ता सोडण्याच्या धमक्या सातत्याने देण्यात येत आहेत. परंतु, प्रत्‍यक्षात मात्र तसे होताना दिसत नाही. गेल्‍या काही दिवसापूर्वी शिवसेनेच्या नेत्‍यांनी राजीनामे खिशात घेऊन फिरत असल्‍याचे म्‍हटले होते. त्‍यावेळीही पावसाळा आहे राजीनामे भिजतील अशी टीका सोशल मीडियावरून होत होती.