होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेने उधळली निरुपम यांची सभा 

मनसेने उधळली निरुपम यांची सभा 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

घाटकोपर : वार्ताहर

मनसे आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्यामध्ये  शनिवारी पुन्हा घाटकोपरमध्ये राडा झाला. संजय गांधी नगरातील झोपड्यांतील तोडक कारवाईविरोधात काँग्रेसने एका सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी काही फेरीवाल्यांनी निरुपम यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता व्यासपीठावरील माईक हिसकावून मनसे कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या.

घाटकोपर पूर्वेतील  संजय गांधी नगरमध्ये पालिकेच्या नाला रुंदीकरणाआड येणार्‍या झोपड्यांवर कारवाई सुरू आहे. या कारवाईला निरुपम यांचा विरोध आहे. सभेत  संजय निरुपम यांचे भाषण संपताच काही मनसैनिकांनी सभेच्या ठिकाणी दाखल होत निरुपम यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. मनसेचे माजी शाखाध्यक्ष राजेश सावंत यांनी व्यासपीठावर चढून सूत्रसंचालकांच्या हातातील माईक हिसकावून घेतला. संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी सावंत यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल फडके यांनी सावंतना पकडून पोलीस ठाण्यात नेले. इतर मनसैनिकांनी देखील पंतनगर पोलीस ठाणे गाठले.त्यानंतर घटनस्थळावरून संजय निरुपम यांनी त्वरित काढता पाय घेतला. 

काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्ष, सभेच्या आयोजक मनीषा सूर्यवंशी म्हणाल्या, गोरगरिबांसाठी आयोजित केलेल्या सभेत धिंगाणा घालणे चुकीचे आहे. पंतनगर पोलिसांनी माजी शाखाध्यक्ष राजेश सावंत यांना अटक करून त्यांच्यावर  कलम 323, 504, 341, 352, 509, 500 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.