Wed, May 22, 2019 11:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसे कार्यकर्त्यांना जामीन नाकारला

मनसे कार्यकर्त्यांना जामीन नाकारला

Published On: Dec 07 2017 2:06AM | Last Updated: Dec 07 2017 1:44AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

आझाद मैदानातील मुंबई प्रदेश कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह आठही आरोपींचा जामीन अर्ज किल्‍ला कोर्टाने फेटाळून लावला असून मनसे कार्यकर्त्याच्या वतीने वकिलांनी सत्र न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. 

फेरीवाल्यांवरील कारवाईवरून काँग्रेससोबत उफाळलेले वाद आणि मारहाणीनंतर 1 डिसेंबरला सहा मनसे कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या मुंबई प्रदेश कार्यालयात घुसून तोडफोड केली होती. आझाद मैदान पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला.

संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश चिल्ले, विशाल कोकणे, हरीष सोळुंकी आणि दिवाकर पडवळ या कार्यकर्त्यांसोबत पोलिसांसमोर शरणागती पत्करली. आझाद मैदान पोलिसांनी आठही आरोपींना अटक करत गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.

पूर्वनियोजित कट रचून कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याने 120 (ब) आणि दंगलीची अन्य भादंवी कलमे ही जामिनपात्र कलमे पोलिसांनी गुन्ह्यात दाखल केली असली तरी, कार्यालयामध्ये घुसून ही तोडफोड करण्यात आल्याने 452 हे अजामिनपात्र कलमसुद्धा दाखल केले आहे. त्यामुळेच किल्ला कोर्टाने देशपांडे यांच्यासह सर्व आरोपींना गुन्ह्याच्या तपासासाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी आणि ही कोठडी संपल्यानंतर सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.