Thu, Apr 25, 2019 17:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'दिल्लीश्वरांच्या चुका त्यांच्या कानठळीत पोहचतील असा भारत बंद करा'

'दिल्लीश्वरांच्या चुका त्यांच्या कानठळीत पोहचतील असा भारत बंद करा'

Published On: Sep 09 2018 1:28PM | Last Updated: Sep 09 2018 1:28PMमुंबई : प्रतिनिधी

पेट्रोल आणि डिझेलचे दर आकाशाला भिडले आहेत, त्यामुळे सामान्य माणूस होरपळून निघाला आहे. या विरोधात देशातील राजकीय पक्षांनी सोमवार १० रोजी पुकारलेल्या भारत बंदला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. नुसता पाठिंबाच नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या बंदमध्ये सक्रीय सहभाग घेऊन दिल्लीश्वरांच्या चुका त्यांच्या कानठळीत पोहचतील असा कडकडीत बंद करा, असे आदेश दिले आहेत.

इंधनाचे दर हे जागतिक बाजारपेठेशी संलग्न असले तरी त्यावर केंद्र आणि राज्यांनी अव्वाच्या सव्वा पद्धतीने कर लादले आहेत. एखाद्याला आलेला झटका हे देशाचं धोरण होऊ शकत नाही. नोटबंदीसारख्या चुकीच्या आर्थिक निर्णयांमुळे अर्थव्यवस्था संकटात आली आणि मग ती सावरायला इंधनावर भरमसाठ कर लादून आर्थिक डोलारा सावरण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाची किंमत सामान्य माणसाने का सोसायची? असा प्रश्न करत राज ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या निर्णयांकडे लक्ष वेधत इंधन दरवाढीच्या विरोधातील भारत बंदला जाहीर पाठिंबा दिला आहे.

इंधनाचे वाढते दर हे सर्वस्पर्शी आहेत. हे सामान्य माणसाने लक्षात घ्यायला हवे, आणि म्हणूनच महाराष्ट्रातील जनतेने स्वतःच्या राजकीय विचारधारा बाजूला ठेऊन भारत बंदमध्ये सामील व्हावे. मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांनी या बंदमध्ये पूर्ण ताकदीने सामील व्हावे, पण हे करत असताना सार्वजनिक मालमत्तेची हाणी होणार नाही आणि सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही, याची काळजी देखील घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.