Mon, May 27, 2019 08:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसे 'पद्मावत'ला संरक्षण देणार ही अफवाच!

मनसे 'पद्मावत'ला संरक्षण देणार ही अफवाच!

Published On: Jan 24 2018 6:30PM | Last Updated: Jan 24 2018 4:28PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' या वादग्रस्त चित्रपटाला महाराष्ट्र नव निर्माण सेना सुरक्षा कवच देणार आहे, ही एक अफवा असल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे. मनसेने अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन वादग्रस्त ठरलेल्या 'पद्मावत' चित्रपटाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली.  

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' चित्रपटाला 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'संरक्षण' देणार असल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांत झळकल्या आहेत. मात्र, अशी कोणतीही अधिकृत भूमिका पक्षाने घेतलेली नाही, असे मनसेचे प्रवक्ता अविनाश अभ्यंकर यांनी मनसे अधिकृत अकाऊंटवर स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने 'पद्मावत' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला असला तरी देशभरातून आजही या चित्रपटाला विरोध करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत चित्रपट प्रदर्शित करु देणार नाही, या भूमिकेवर करणी सेनेचे कार्यकर्ते ठाम आहेत.

यापूर्वी मनसेच्या सरचिटणीस व चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी 'पद्मावत' चित्रपटाचे समर्थन केले होते. ‘पद्मावत’ला सेन्सॉर बोर्ड आणि सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेली असताना विरोध करणे चुकीचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ‘पद्मावत’ प्रदर्शित होण्यासाठी आवश्यकता भासल्यास मनसे संरक्षणास सज्ज असेल, असे मत शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केले होते.