Thu, Aug 22, 2019 10:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिशीर शिंदे ‘इंजिनाची’ साथ सोडून करणार घरवापसी ? 

शिशीर शिंदे ‘इंजिनाची’ साथ सोडून करणार घरवापसी ? 

Published On: May 17 2018 12:47PM | Last Updated: May 17 2018 12:47PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

मुंबई पालिकेतील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याच्या धक्यातून अद्याप सावरले नसलेल्या मनसेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षातील जुने नेते शिशीर शिंदे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता सध्या रंगली आहे. शिंदे इंजिनाची साथ सोडून धनुष्यबाण हाती घेणार असल्याचे वृत्त आले आहे. 

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि शिशीर शिंदे यांची एका कार्यक्रमात भेट झाली होती. या भेटीत त्यांच्यात बराच वेळ चर्चा झाली होती. त्यानंतरच शिदेंच्या सेनाप्रवेशाची शक्यता वर्तविण्यात येत होती. काही दिवसांपूर्वीच मनसेच्या सहा नगरसेवकांच्या सेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे मुंबई उपनगरातील मनसेची ताकद कमी झाल्याची चर्चा सुरु झाली होती. आता शिशीर शिंदेंसारख्या जुन्या नेत्याने साथ सोडली तर मनसेला आगामी निवडणुकीत मोठा तोटा होऊ शकतो.  

राज ठाकरे यांनी २००६ मध्ये सेनेला रामराम ठोकल्यानंतर शिंदेही त्यांच्यासोबत मनसेत आले. २००९च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी  भांडूप (प.) मतदारसंघातून विजय मिळवला होता. पण, आता इतक्या दिवसानंतर ते राज ठाकरेंची साथ सोडणार का? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, गेल्या मनपा निवडणुकीत शिंदे यांना फार महत्त्व दिले गेले नव्हते. त्यामुळे शिंदे यांनी त्याबाबतची नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. अर्थात शिंदे यांनी मनसेतच राहणार की शिवसेनेत जाणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.