Fri, Apr 26, 2019 15:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेसचा 'हात' भाजपच्या घशात !

काँग्रेसचा 'हात' भाजपच्या घशात !

Published On: May 22 2018 2:46PM | Last Updated: May 22 2018 2:46PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला नाकारलं, या वक्तव्यातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पराभवाच्या जखमेवर मलम लावण्याचे काम करत आहेत. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजपला पुन्हा एकदा डिवचले आहे. कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलर आणि काँग्रेस युतीने भाजपाला दणका दिल्याचे सांगण्यासाठी  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेस-जेडीएसने भाजपच्या ‘घशात हात घालून सत्ता बाहेर काढली!’ असे त्यांनी व्यंगचित्रातून उभे केले आहे.  

कर्नाटक विधानसभेत भाजप मोठा पक्ष ठरला. मात्र त्यांना बहुमत मिळवण्यात अपयश आले. मोठा पक्ष असल्यामुळे राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले. येडियुरप्पा यांनी कर्नाटच्या मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. पण, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर शनिवारी बहुमत नसल्याचे सांगत येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर जनता दल सेक्युलर आणि काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. बुधवारी काँग्रेस-जेडीएस मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. 

काँग्रेस-जेडीएस यांच्या शपथविधीपूर्वी राज ठाकरे यांनी भाजपला चिमटा काढला आहे. सर्वात कमी जागा मिळवलेल्या जेडीएसला पाठिंबा देत काँग्रेसने भाजपाच्या घशात हात घालून सत्ता बाहेर काढली, असे व्यंगचित्र त्यांनी  रेखाटले आहे.  .