होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘मेस्मा’वरून विधिमंडळ दणाणले

‘मेस्मा’वरून विधिमंडळ दणाणले

Published On: Mar 22 2018 1:43AM | Last Updated: Mar 22 2018 1:36AMमुंबई : प्रतिनिधी

अंगणवाडी कर्मचार्‍यांना ‘मेस्मा’ (अत्यावश्यक सेवा कायदा) लागू करण्यावरून विधिमंडळ दणाणून गेले. विधानसभा व विधान परिषदेत शिवसेनेने, ‘मेस्मा’ रद्द केल्याशिवाय कामकाज चालू देणार नसल्याची भूमिका घेतली. विधानसभेत काँग्रेस व राष्ट्रवादीने शिवसेनेच्या मागणीला पाठिंबा दिला. शिवसेनेच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनापर्यंत धाव घेऊन राजदंडही उचलला. याप्रश्‍नी सरकार चर्चेला तयार असून कोणत्याही परिस्थितीत संघटनांच्या राजकारणाला आपण बळी पडणार नसल्याची भूमिका महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आक्रमकपणे मांडली. या गदारोळात विधानसभेचे कामकाज तब्बल नऊवेळा तहकूब करण्यात आले.

विधानसभेचे कामकाज सुरू होताच शिवसेनेचे सदस्य आक्रमक होत, ‘अंगणवाडी कर्मचार्‍यांवरील ‘मेस्मा’ रद्द झालाच पाहिजे’, अशा घोषणा देत वेलमध्ये उतरले. त्यावेळी अध्यक्षांनी विजय औटी यांना बोलण्याची परवानगी दिली. मात्र, सभागृहातील गदारोळामुळे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्याने कामकाज परत 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

कामकाज पुन्हा सुरू होताच विजय औटी यांनी, अंगणवाडी कर्मचार्‍यांचा आंदोलनाचा हक्‍कच काढून घेऊन लोकशाहीचा खून केल्याचा आरोप केला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी, कोणालाही आंदोलन करण्यापासून परावृत्त करण्यासाठी धमकी देणे योग्य नसल्याचे सांगितले. अजित पवार यांनी, अंगणवाडी कर्मचार्‍यांना दिवसाला 150 रुपये मिळतात, त्यामध्ये एक वेळचे जेवण तरी येते का, असा सवाल केला. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सरकारची याप्रश्‍नी चर्चेची तयारी असल्याचे सांगितले.

पंकजा मुंडे यांनी, केंद्र सरकारच्या नियमानुसार कुपोषित बालके, गर्भवती महिला व स्तनदा मातांना योग्यवेळी आहार पुरविण्याची जबाबदारी अंगणवाडी कर्मचार्‍यांवर असून कुपोषित बालकांना वेळेत आहार मिळाला नाही व त्यांचा मृत्यू झाला, तर जबाबदारी घेणार का, अशी विचारणा केली.

तहकुबीनंतर सभागृहाने डॉ. कृष्णचंद्र भोईटे यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव संमत केला. या शोकप्रस्तावानंतर पुन्हा गदारोळ सुरू झाला. यावेळी शिवसेनेचे सदस्य प्रचंड आक्रमक झाले व त्यांनी अध्यक्षांच्या आसनापर्यंत धाव घेऊन याप्रश्‍नी न्याय द्या, अशी मागणी केली. तर अध्यक्षांनी सुनील प्रभू यांना बोलण्याची संधी देतो; पण सदस्यांना जागेवर बसायला सांगा, असे सांगितले. पंकजा मुंडे यांनी, अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या असून काही संघटनांनी वेगळी भूमिका घेतली आहे; पण कोणत्याही परिस्थितीत संघटनांच्या राजकारणाला बळी पडणार नसल्याचे ठणकावून सांगितले.

सुनील प्रभू यांनी, विधवा व परित्यक्त्या याच प्रामुख्याने अंगणवाडी सेविका असल्याचे सांगून त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे सांगितले. त्या मानधनावर काम करतात, त्या सेवेत नसल्याने त्यांना ‘मेस्मा’ लावता येणार नाही, अशी भूमिका मांडली. जर त्यांना ‘मेस्मा’ लावायचा असेल, तर त्यांना सेवेत घेऊन सातवा वेतन आयोग लागू करा, अशी मागणी केली. त्यानंतरच्या गदारोळात पुन्हा कामकाज तहकूब करण्यात आले. साडेतीन वाजेपर्यंत हीच परिस्थिती कायम राहिल्याने पुन्हा तीनवेळा कामकाज तहकूब करून शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

विधान परिषद दिवसभरासाठी तहकूब

अंगणवाडी सेविकांनी आपल्या न्याय हक्‍कांसाठी सरकारविरोधात मोर्चा काढून संप पुकारू नये, यासाठी ‘मेस्मा’सारखा जुलमी कायदा लावण्यात आला आहे. अंगणवाडी कर्मचार्‍यांवर अन्याय करणारा ‘मेस्मा’ रद्द केल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका घेत काँग्रेस-राष्ट्रवादीसह सत्ताधारी शिवसेनेच्या सदस्यांनी विधान परिषदेच कामकाज रोखून धरले. यामुळे उडालेल्या गोंधळामुळे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सुरुवातीला 23 मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. त्यानंतरही शिवसेनेसह विरोधी सदस्य आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने तालिका सभापतींनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.

विधान परिषदेच कामकाज सुरू होताच शिवसेना गटनेते अ‍ॅड. अनिल परब यांनी, अंगणवाडी सेविकांबाबत महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भूमिका आडमुठेपणाची असल्याचे सांगत ‘मेस्मा’च्या निर्णयाबाबत निषेध नोंदविला. कुपोषणाच्या ज्या कारणासाठी हा ‘मेस्मा’ लावला जात आहे, त्याच न्यायाने पोषण आहाराचे आठ-आठ महिने पैसे दिले नाहीत. अंगणवाडी सेविकांना वेळेवर साहित्य दिले जात नाही. ज्यांनी अत्यावश्यक सेवेची हेळसांड केली, त्या अधिकार्‍यांवर ‘मेस्मा’अंतर्गत कारवाई करा. ‘मेस्मा’ रद्द करण्याबाबत निर्णय होईपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

‘मेस्मा’ रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेना तसेच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी वेलमध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी केल्याने उडालेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.