Wed, Jun 26, 2019 18:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेची नौटंकी निवडणुकांपर्यंत!

शिवसेनेची नौटंकी निवडणुकांपर्यंत!

Published On: Jan 26 2018 1:35AM | Last Updated: Jan 26 2018 1:13AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

भाजपासोबत राज्य आणि केंद्रामध्ये सत्तेत वाटेकरी असतानाही सरकारच्या कारभारावर सतत नाराजी व्यक्त करणार्‍या शिवसेनेची नौटंकी निवडणुकांपर्यंतच असेल, असे टिकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी  सोडले आहे.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तटकरे म्हणाले, शिवसेनेने आतापर्यंत अनेक निवडणुका भाजपासोबत लढविल्या आहेत. आता भाजपा युती करणार नसल्याची खात्री झाल्यामुळे शिवसेनेने यापुढच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या 150 जागा जिंकण्याचा दावा या पक्षाचे नेते उध्दव ठाकरे यांनी केला आहे. सत्तेत एकत्र राहायचे आणि टीकाही करायची हे शिवसेनेचे धोरण आहे.  त्यामुळे शिवसेनेची ही नौटंकी पुढच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत असेल. तसेच तोपर्यंत हा पक्ष सत्तेतच राहील, असे सांगत तटकरे यांनी मध्यावधी निवडणुकीची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले.

राज्य सरकारविरुध्द जनतेची नाराजी व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल मोर्चांचे आयोजन केले आहे. गेल्या नऊ दिवसांपासून मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून निघालेल्या हल्लाबोल यात्रेच्या तिसर्‍या टप्प्याचा समारोप 3 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. या आंदोलनात आतापर्यंत 27 जाहीर सभा झाल्या. त्यात साधारण सहा लाख लोक सहभागी झाले. यात तरूणांची संख्या लक्षणीय होती. 

मोर्चाचा तिसरा टप्पा येत्या 15 फेब्रुवारीपासून अहमदनगरमधून सुरू होईल. नाशिक, नंदुरबार, धळे व जळगाव जिल्ह्यात हा मोर्चा नेला जाणार आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये 11 मार्चला याची सांगता होईल, अश माहितीही त्यांनी दिली.