Fri, Apr 26, 2019 16:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘मातोश्री’च्या बाहेर फेरीवाले बसवू

‘मातोश्री’च्या बाहेर फेरीवाले बसवू

Published On: Jan 19 2018 2:10AM | Last Updated: Jan 19 2018 1:56AMमुंबई : प्रतिनिधी 

फेरीवाला व ना फेरीवाला क्षेत्राचा वाद आता चांगलाच तापला आहे. राज ठाकरे यांच्या घरासमोर फेरीवाला बसणार असल्यामुळे मनसे आक्रमक झालेली असताना आता या वादात स्वाभिमानी पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांनीही उडी घेतली आहे. फेरीवाले आमच्या घरासमोर बसवाच, मग मातोश्रीसमोर फेरीवाले कसे बसवायचे ते आम्ही ठरवू, असा इशाराच त्यांनी शिवसेनेला दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राणे व ठाकरे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर येणार आहे. 

मुंबई महापालिकेने जाहिर केलेल्या फेरीवाला व ना फेरीवाला क्षेत्राचा राज ठाकरेंसह विविध सेलिब्रेटी, चित्रपट कलावंत व नितेश राणे यांनाही त्रास सहन करावा लागणार आहे. राणे यांच्या जुहू येथील बंगल्यासामेरील रस्त्या फेरीवाला क्षेत्र जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे संतापलेल्या आमदार नितेश राणे यांनी गुरूवारी थेट पालिका मुख्यालय गाठून पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. 

या भेटीत राणे यांनी फेरीवाला व ना फेरीवाला क्षेत्राचा पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना राणे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर निशाना साधला. शिवसेनेने पालिकेतील सत्तेचा गैरवापर करत, फेरीवाला क्षेत्रातून उध्दव ठाकरे यांच्या कलानगर येथील मातोश्रीला वगळण्यात आले आहे. जर राज ठाकरे, नारायण राणे, आमिर खान, संजय दत्त, व अन्य सेलिब्रेटी व नेत्यांच्या घरासमोर फेरीवाले बसणार असतील तर, मोतोश्री समोर का नाहीत, असा सवालही राणे यांनी केला. फेरीवाला क्षेत्रामध्ये मातोश्रीसमोरील रस्ता न घेतल्यास आपण मातोश्री समोर फेरीवाले बसवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.