Thu, Jun 27, 2019 16:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आमदार कथोरेंच्या सहकारी सेवा सोसायटीची होणार चौकशी!

आमदार कथोरेंच्या सहकारी सेवा सोसायटीची होणार चौकशी!

Published On: Aug 28 2018 1:45AM | Last Updated: Aug 28 2018 12:59AMबदलापूर : वार्ताहर

बदलापूर ग्रामीण भागातील सागाव येथे सहकारी संस्था रजिस्टर करताना बनावट स्वाक्षरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. याप्रकरणी उल्हासनगर न्यायालयाच्या न्यायाधीशांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या सहकारी संस्थेच्या मुख्य प्रवर्तक पदावर आमदार किसन कथोरे असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. तर दुसरीकडे कथोरे यांनी हे आरोप राजकीय हेतुने केल्याचे स्पष्ट केले आहे. 

बदलापुरात ‘सागाव परिसर विविध कार्य सेवा सहकारी संस्था’ स्थापन करण्यात आली आहे. या सहकारी संस्थेच्या मुख्य प्रवर्तक म्हणून आमदार किसन कथोरे यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. मात्र ही सहकारी संस्था नोंदणीकृत करताना बनावट स्वाक्षरी करण्याबरोबरच संस्थेमध्ये नोंद असलेले काही सदस्य मृत असताना देखील त्यांची नावे पुढे करण्यात आल्याचा आरोप तक्र्रारदार प्रभू पाटील यांनी केला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा यासाठी पाटील यांनी उल्हासनगर न्यायालयात दावा दाखल केला होता.या दाव्यावर निकाल देताना न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

दरम्यान, आमदार कथोरे यांनी पत्रकार परिषद घेेऊन हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने पुढे करण्यात आल्याचे सांगितले. शासनाने सेवा सोसायटीला मंजुरी देताना मूळ प्रस्तावानुसारच मंजुरी दिली होती. त्यामुळे 2006 मध्ये असलेल्या शेतकर्‍यांची नावे त्यात राहिली. त्यांच्या मृत्यूचे दाखले देण्यात आलेले आहेत. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नावे स्वाक्षरी केल्याचा आरोप चुकीचा आहे. त्यांची पडताळणी करण्याचे काम शासकीय यंत्रणांचे असल्याचे कथोरे यांनी सांगितले.

सेवा सोसायटीच्या माध्यमातून कोणतेच आर्थिक व्यवहार करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यात आर्थिक घोळ असल्याचा आरोप चुकीचा आहे. मूळात शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध व्हावे या हेतूने अशा सेवा सोसायटी उभारल्या जातात. सोसायटी उभी करणे हे चुकीचे नाही. ते शेतकर्‍यांच्या हिताचे होते आणि ते काम आपण केले आहे. शासन स्तरावर परवानगी मिळत नसतानाही अशा सोसायटी स्थापन करून शेतकर्‍यांना न्याय देण्याचे काम आपण केले आहे. त्यात गैर काही झालेले नाही. या संदर्भात आपण चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असून सत्य लवकरच पुढे येईल, असेही कथोरे यांनी सांगितले.