Mon, Nov 12, 2018 23:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुणीही उठतो, लोकप्रतिनिधींवर आरोप करत सुटतो...!

कुणीही उठतो, लोकप्रतिनिधींवर आरोप करत सुटतो...!

Published On: Mar 08 2018 1:48AM | Last Updated: Mar 08 2018 1:15AMवसई : प्रतिनिधी

वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मंगळवारी विधानसभेत आपल्या मतदारसंघात सध्या काय सुरू आहे, याचा पाढा वाचला. कोणीही उठतो आणि आम्हा लोकप्रतिनिधींवर बेछूट आरोप करत सुटतो, माहितीच्या अधिकाराच्या नावाखाली सेटिंग होते, लोकप्रतिनिधींच्या लेटरहेडचा गैरवापर केला जातो. यावर आपण काही करणार आहोत की नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

वसई-विरार परिसरात अनधिकृत बांधकाम व्यावसायिक आणि अधिकार्‍यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढले आहेत. आमदारांची लेटरहेड वापरून धमकावणे, चौकशी लावणे, चौकशीत सेटिंग आदींमुळे लोकप्रतिनिधी बदनाम होत आहेत. सेनेचा कार्यकर्ता धनंजय गावडे, राष्ट्रवादीचा गोविंद गुंजाळकर, माझ्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ज्याचा उल्लेख झाला तो प्रमोद दळवी,( तो माझ्या पक्षाचा कार्यकर्ता नाही) डॉ.यादव व अन्य एक अधिकारी अजित कवडे यामध्ये सामील आहेत. आमदार आनंद ठाकूर, धनंजय मुंडे आणि माझ्या नावाची बाहेर चर्चा सुरू आहे. त्यावर काही कारवाई होणार की नाही ? ज्याच्याकडे कोट्यवधी रूपये सापडतात त्याच्यावर कारवाई होत नाही. माहितीच्या अधिकाराच्या नावाखाली माझ्या मतदारसंघात जे काही चालले आहे, त्यावर काही कारवाई होणार की नाही? असा सवाल त्यांनी केला.

आम्ही गैरव्यवहार केले असतील तर चौकशी करा, मी स्वत: अशा चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. परंतु, हे जे गैरप्रकार करणारे आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी ठाकूर यांनी केली. यावेळी त्यांनी अन्य पक्षांच्या आमदारांवरही टिप्पणी केल्यामुळे आक्षेप घेण्यात आला. परंतु ठाकूर यांनी मी आरोप करत नाही, मी आम्हा आमदारांना कसे बदनाम करण्यात येत आहे, ते सभागृहासमोर ठेवत आहे, असे स्पष्ट केले. आमदार ठाकूर सहसा सभागृहात बोलत नाहीत,परंतु मंगळवारी त्यांनी वसई-विरार भागात सध्या जे काही चालले आहे त्यावर घणाघाती हल्ला चढवला.