होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजप आमदाराचे पवारांना जमाल‘गोटे’

भाजप आमदाराचे पवारांना जमाल‘गोटे’

Published On: Feb 23 2018 7:22PM | Last Updated: Feb 23 2018 7:54PMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात घेतलेल्या मुलाखतीप्रसंगी एका प्रश्‍नाला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बँका बुडवून पळून गेलेले सर्व भाजपचेच मित्र आहेत, असा आरोप केला होता. या आरोपावर भाजपच्या एकाही बड्या नेत्याने टीका केली नाही. मात्र, या पक्षाच्या एका आमदाराने पत्र पाठवून पवारांना चांगलेच जमाल ‘गोटे’ दिले आहेत.

भाजपचे धुळ्यातील आमदार अनिल गोटे यांनी मात्र खुले पत्र लिहून पवारांना आव्हान दिले आहे. सत्याच्या प्रयोगात आपण महात्मा गांधीनाही हरविले असल्याची टीका करत आमदार गोटे यांनी पवारांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. बँका बुडवून पळून गेलेले सर्व भाजपचेच मित्र आहेत, असा आरोप करणार्‍या पवार यांना ललित मोदी कोण होते, असा सवाल करत गोटे यांनी त्यांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष असताना आयपीएलच्या चेअरमनपदी ललित मोदी यांना बसविण्यात आपला सिंहाचा वाटा होता. मोदींमुळे क्रिकेट बोर्ड श्रीमंत झाले. मैदानाच्या चौफेर  लावलेल्या जाहिरातींमुळे कोट्यवधी रुपये जमा होत असताना ललित मोदी यांना देश सोडून पळून का जावे लागले, तेव्हा कुणाचे सरकार होते, असे सवाल गोटे यांनी उपस्थित केला.

सध्या जगातील मद्यनिर्मितीत पहिल्या पाच उत्पादकांपैकी विजय मल्ल्या याचे नाव घेतले जाते. बारामती वाईन फॅक्टरीतील एक भागीदार असलेल्या मल्ल्यासोबतची आपली मैत्री जगजाहीर आहे. तोही बँकांचे शेकडो कोटी रुपये कर्ज बुडवून पळाला आहे. कोणाचे सरकार असताना विजय मल्ल्याला बँकांनी कर्जपुरवठा केला होता, असे विचारत एका कर्ज प्रकरणात आपली शिफारस होती, असे गोटे यांनी पत्रात नमूद केले आहे. मल्ल्यासोबतच्या एकाही छायाचित्रात नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग, देवेंद्र फडणवीस दिसत नाहीत. विजय मल्ल्याच्या चार पाचशे कोटी रुपयांच्या विमानाचा शुभारंभ फीत कापून आपण केला होता. तेलगीचे दुसरे लाभार्थी एस. एम. कृष्णा हे तेव्हा विमान वाहतूकमंत्री होते. तरी मल्ल्या भाजपचा मित्र होता, असे लबाड बोलला आहात, असा टोलाही त्यांनी पवारांना लगावला.

राजकारणाचा भाग म्हणून आपण ध्येय धोरणावर कडाडून टीका करा; पण आमच्या नेत्यांचे चारित्र्य हनन करू नका. अन्यथा महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील शेकडो अनिल गोटे गोटमार करतील, असा इशाराही आमदार गोटे यांनी पवार यांना दिला आहे.

...तर पुरावा पाठवून देईन : गोटे
कुविख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ नुरा याने एका मुलाखतीमध्ये आपण त्यांचे खास मित्र असल्याचा उल्‍लेख केला आहे. आठवड्यात दोन-चार वेळा आपल्या दोघांमध्ये संवाद घडत होता, असेही नुरा याने म्हटले आहे. याबाबतचा पुरावा आपल्याकडे आहे. दाऊदचे आणि आपले संबंध नाहीत, असे बोलून कोणी आपल्याला आव्हान देऊ नये, यासाठी दोघांमधील संवादाचा पुरावा आपल्याकडे पाठवून देईल, असे आव्हानही गोटे यांनी दिले.