Thu, Apr 25, 2019 08:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तोतया म्हाडा अधिकार्‍याने महिलेस घातला २० लाखांचा गंडा

तोतया म्हाडा अधिकार्‍याने महिलेस घातला २० लाखांचा गंडा

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 10 2018 1:05AM

बुकमार्क करा
ठाणे : प्रतिनिधी

बड्या राजकीय नेत्यांचा नातेवाईक असून मी म्हाडात अधिकारी असल्याची बतावणी करत एका मॅट्रिमोनियल साईटवरून कळवा येथील महिलेशी ओळख वाढवून तिला 20 लाखांचा गंडा घालणार्‍या भामट्यास ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अभय गवत (वय 42) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याने अशाच प्रकारे आणखी दोन महिलांना फसवल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून या तोतया अधिकार्‍याचे आणखी काही कारनामे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

शादी डॉट कॉम या मॅट्रिमोनियल साईटवर लग्नासाठी प्रोफाइल बनवून त्यावर म्हाडा अधिकारी असल्याची माहिती या भामट्याने टाकली होती. दरम्यान, कळवा येथे राहणार्‍या एका महिलेने ही प्रोफाइल बघून विवाहास इच्छूक असल्याची संमती साईटवरून दर्शवली. त्यानंतर अभय गवत याने संबंधित महिलेशी व तिच्या परिवाराशी संपर्क साधून त्यांना आपण म्हाडात अधिकारी असल्याचे तर सांगितलेच परंतु त्याने बड्या राजकीय नेत्यांचा नातेवाईक असल्याचीही फुशारकी मारली. यानंतर सदर महिला गवत याच्यासोबत लग्नास तयार झाली. मात्र लग्नानंतर काही दिवसातच या भामट्याने सदर महिला व तिच्या नातेवाईकांकडून 20 लाख रुपये घेतले. याच दरम्यान गवत याचे आधीच दोन लग्ने झालेली असून त्यास दुसर्‍या पत्नीपासून दोन मुले असल्याची माहिती कळवा येथील महिलेस मिळाली. त्यानंतर तिने कळवा पोलीस ठाण्यात अभय गवत याच्या विरोधात तक्रार दाखल केली. आपल्या विरोधात तक्रार दाखल झाल्याचे कळताच गवत हा फरार झाला. मात्र पोलिसांनी त्याचा कसून शोध घेत त्यास ठाणे जिल्ह्यातील वसारी येथून अटक केली.