Sat, Mar 23, 2019 12:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › म्हाडाची घरे होणार स्वस्त?

म्हाडाची घरे होणार स्वस्त?

Published On: Sep 03 2018 1:40AM | Last Updated: Sep 03 2018 1:40AMमुंबई : प्रतिनिधी 

नोव्हेंबरमध्ये काढण्यात येणार्‍या मुंबईतील घरांच्या सोडतीमध्ये म्हाडाने सुखद धक्‍का देण्याचे ठरविले आहे. उच्च आणि मध्यम उत्पन्‍न गटांतील घरांच्या किमती बाजारभावापेक्षा 20 टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 

अत्यल्प आणि अल्प उत्पन्‍न गटातील म्हाडाची घरे  तशी आवाक्यात असली तरी उच्च आणि मध्यम उत्पन्‍न गटांतील लोकांना मात्र ही घरे तशी परवडण्यासारखी नाहीत. अलीकडे या घरांच्या किमती खासगी विकासकांच्या किमतीइतक्याच वाढल्या आहेत. हे लक्षात आल्यानंतर या गटांतील घरांच्या किमती बाजारभावापेक्षा वीस टक्के कमी करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला असून, याबाबतचा प्रस्ताव म्हाडाच्या उपाध्यक्षांकडे पाठवण्यात आला असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. 

नोव्हेंबरमध्ये काढण्यात येणार्‍या म्हाडाच्या एक हजार घरांच्या लॉटरीमध्ये समावेश करण्यात आलेल्या घरांच्या किमती ठरवण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. यातील मध्य आणि उच्च उत्पन्न गटामध्ये असलेल्या घरांच्या किमती कमी कराव्यात या विचाराप्रत म्हाडाचे प्रशासन आले आहे. 

या लॉटरीमध्ये मध्यम उत्पन्न गटामध्ये कन्नमवारनगर, विक्रोळीमध्ये 28 घरे, महावीर नगर, कांदिवली येथील 172 घरे, पीएमजीपी, मानखुर्द याठिकाणी 16 घरे अशी एकूण 216 घरे ही मध्यम गटामध्ये असणार आहेत. तसेच उच्च गटासाठी पंतनगर, घाटकोपर येथे 2 घरे अशी घरे असणार आहेत. सध्या येथील घरांच्या किमती खूपच जास्त असल्याने त्या सामान्यांना परवडणार्‍या नाहीत. गेल्यावर्षीच्या म्हाडा लॉटरीमध्येही लोअर परळ येथील घरांच्या किमती खूपच असल्याने या घरांना कमी प्रतिसाद लाभला होता, तर ज्यांना ही घरे लॉटरीमध्ये जाहीर झाली त्यातील बहुतांश जणांनी ही घरे म्हाडाला साभार परत केली आहेत. तसेच या घरांच्या किमती जास्त ठेवल्याने म्हाडावर बरीच टीकाही झाली होती. यामुळे यंदा म्हाडाने अत्यल्प आणि अल्प गटातील घरांची संख्या वाढवली आहे. तसेच मध्यम आणि उच्च गटातील घरांच्या किंमती कमी करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर पुढील प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. 

एक हजार घरांच्या काढण्यात येणार्‍या लॉटरीमध्ये ही  घरे  म्हाडाला हाऊसिंग स्टॉकमधून मिळाली आहेत. पुनर्विकासाच्या विविध योजनांमधून विकासक काही घरे म्हाडाला देतात. अनेक योजनांमधून म्हाडाकडे घरांचा साठा होत असतो. यापूर्वीच्या लॉटरीमध्ये या घरांसाठी म्हाडा रेडी रेकनरचा दर लावत असे. परंतु त्यामुळे घराच्या किमती जास्त होत असल्याने लोक माघार घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर म्हाडाने आता धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हाडाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. घरांच्या किमती आता बाजारभावापेक्षा 20 टक्क्यांनी कमी असतील, त्यामुळे घरांच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र हे धोरण फक्त मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी असेल. अल्प व अत्यल्प गटासाठी धोरण कायम असेल. याआधी 2016 मध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाने काढलेल्या सोडतीतील 70 टक्के विजेत्यांनी घरांच्या किमतीमुळे घरे म्हाडाला परत केली होती. त्यानंतर म्हाडाने परत आलेल्या घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील नागरिकांना संधी दिली आहे.