Mon, Jan 21, 2019 06:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › म्हाडाचा आणखी एक कार्यकारी अभियंता निलंबित

म्हाडाचा आणखी एक कार्यकारी अभियंता निलंबित

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

म्हाडातील भूखंडवाटप तसेच भाडेकराराच्या नूतनीकरणातील अनियमितते प्रकरणी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळातील कार्यकारी अभियंता के. डी.सुरवाडे या अधिकार्‍याचे निलंबन करण्यात आले आहे.

गेल्याच आठवड्यात गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणात गोरेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता डी. के. महाजन यांना निलंबित करण्यात आले. त्याला म्हाडातील महाराष्ट्र गृहनिर्माण कर्मचारी संघटनेने विरोध केला असतानाच आणखी एक कार्यकारी अभियंता निलंबित झाल्याने म्हाडा प्रशासनात खळबळ उडाली आहे.  पत्राचाळ प्रकरणात  आणखी काही अधिकार्‍यांची चौकशी सुरू असून यापुढेही अधिकार्‍यांच्या निलंबनाची मालिका अशीच सुरू राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

2005 मधील भूखंड वाटपातील अनियमितता व वरिष्ठ अधिकार्‍यांना कोणतीही कल्पना न देता भूखंडाच्या भाडेकराराचे नूतनीकरण  केले, असा ठपका सुरवाडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एका संस्थेने भुईभाडे थकवले होते. तर अन्य एका संस्थेने म्हाडाच्या भूखंडाचा वापर व्यावसायिक कामासाठी करण्याचा प्रयत्न केला होता. पण तरीही भाडे कराराचे नूतनीकरण करण्यात आले. या अनियमितता लक्षात घेऊन या अधिकार्‍यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी लोकलेखा समितीनेही ताशेरे ओढल्याने या प्रकरणामध्ये कार्यकारी अभियंत्याचे निलंबन करण्यात आले. या प्रकरणामध्ये आणखी एका वरिष्ठ दुरूस्ती मंडळातील अधिकार्‍याचे नाव पुढे येत असून या अधिकार्‍यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.