Wed, Jul 24, 2019 12:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › म्हाडा सोसायट्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत 

म्हाडा सोसायट्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत 

Published On: Feb 25 2018 1:42AM | Last Updated: Feb 25 2018 1:34AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईतील 56 म्हाडा सोसायट्यांचा पुनर्विकास टिट बिट जमिनीच्या वादावरून अडकला आहे. या सोसायट्या पुनर्विकासाकडे डोळे लावून बसल्या आहेत. मात्र जमिनीचा वाद मिटत नसल्याने हा प्रश्‍न रेंगाळत पडला आहे. मुंबईतील अवघ्या चार सोसायट्यांना पुनर्विकासाबाबतचे ऑफर लेटर मिळाले आहे. दोन सोसायट्यांच्या मध्ये असलेल्या जागेवर नेमका कुणाचा ताबा या प्रश्‍नावर अनेक सोसायट्यांमध्ये वाद सुरू असल्याने हा प्रश्‍न चिघळला आहे. 

म्हाडाच्या प्रीमियम पुनर्विकासामध्ये 3 एफएसआय, क्‍लस्टर पुनर्विकासामध्ये 4 एएफएसआय देण्यात येतो. त्यामध्ये 504 चौ. फूटांचे घर देण्याची तरतूद आहे. म्हाडाच्या मुंबईतील 56 सोसायट्यांमध्ये 104 ले आऊट असून एकूण 3 हजार 701 सोसायट्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या इमारतींमध्ये तब्बल 88 हजार कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. म्हाडा सोसायट्यांचा पुनर्विकास 33-5 अन्वये करण्यात येणार आहे. पुनर्विकासाठी यापैकी 25 सोसायट्यांतर्फे म्हाडाकडे अर्ज दाखल करण्यात आले असून त्यापैकी 4 जणांना ऑफर लेटर देण्यात आले आहेत. अनेक सोसायट्यांमध्ये टिट बिटच्या जागेवरून वाद सुरू असल्याने याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार म्हाडाने राज्य सरकारकडे मागितले आहेत. 

म्हाडाच्या सोसायट्यांच्या पुनर्विकासाला 2010 पर्यंत हाऊसिंग स्टॉक व प्रीमियम असे दोन पर्याय देण्यात येत होते. मात्र त्यानंतर म्हाडाकडे जागा नसल्याने म्हाडाने केवळ हाऊसिंग स्टॉकचाच पर्याय दिला. परंतु हा पर्याय बिल्डरांना परवडत नसल्याने बिल्डरांनी पुनर्विकासाकडे पाठ फिरवली होती. 2016 मध्ये सरकारने नवे धोरण आखून 4 हजार चौरस मीटरपेक्षा जास्त जागेवरील पुनर्विकासासाठी हाऊसिंग स्टॉक व त्यापेक्षा कमी जागेवरील पुनर्विकासासाठी प्रीमियमचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे बिल्डरांनी पुनर्विकासासाठी अर्ज दाखल केले आहेत. 
हा प्रश्‍न लवकर सुटावा व पुनर्विकास होऊन नवीन इमारतीत राहण्याची संधी मिळावी अशी विनंती या इमारतींमध्ये जीव मुठीत धरून राहणारे लाखो नागरिक करत आहेत.