Mon, Apr 22, 2019 21:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › थकीत भाड्याचा अहवाल मागवला!

थकीत भाड्याचा अहवाल मागवला!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

सिद्धार्थ नगर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या (पत्राचाळ) पदाधिकार्‍यांसमवेत म्हाडाच्या अधिकार्‍यांच्या झालेल्या बैठकीत सोसायटीला 2 दिवसांत थकीत भाड्याच्या रकमेसंबंधी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी दिले.   

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाद्वारे म्हाडाला सुमारे एक हजार कोटींचा चुना लावणार्‍या गुरू आशिष विकासकाकडून प्रकल्प काढून घेत बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, यानंतर तात्काळ पत्राचाळ पुनर्विकासाच्या कामाचा चुकीचा अहवाल सादर करणार्‍या म्हाडातील एका अभियंत्याचे तातडीने निलंबनही करण्यात आले. यानंतर शुक्रवारी म्हाडाने सोसायटीच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. 

या बैठकीत भाडे मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या रहिवाशांनी सोसायटीकडे गार्‍हाणे मांडले. तसेच मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीमध्ये रहिवाशांनी ही बाबही मांडली होती. भाड्याची किती रक्कम ठरली होती, किती रहिवाशांना भाडे दिले, किती रहिवाशांचे भाडे थकले, कोणत्या महिन्यांपर्यंत भाडे दिले आहे, किती महिन्यांचे भाडे थकीत आहे, या संबंधीचा अहवाल सोसायटीला म्हाडाकडे सादर करायचा आहे, असे सुभाष लाखे यांनी सांगितले.