मुंबई : प्रतिनिधी
2017 मधील म्हाडाच्या लॉटरीतील 36 महागड्या घरांपैकी 29 घरे विजेत्यांनी म्हाडाला परत केली आहेत. या महागड्या घरांची रक्कम आपल्या आवाक्याबाहेर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लोअर परळ भागात म्हाडाचे 365 स्क्वेअर फुटाचे घर 1 कोटी 42 लाख, तर 475 स्क्वेअर फुट घरासाठी 1 कोटी 96 लाख रूपये किंमत असल्याने लॉटरीद्वारे जिंकलेली घरे न घेण्याचा निर्णय काहींनी घेतला आहे. लोअर परळच्या महागड्या 36 घरांपैकी 29 लॉटरी विजेत्यांनी ही घरे परत केली आहेत. याखेरीज पवईतही अनेक जणांनी म्हाडाची घरे नाकारली आहेत. पवईत म्हाडाच्या घरांच्या किमती 1.39 कोटी रूपये एवढ्या आहेत.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2017 साली मुंबईतील विविध ठिकाणच्या 819 घरांची लॉटरी काढली होती. तुंगा पवई येथील, 1 कोटी 39 लाख 5 हजार रुपये किंमतीच्या 168 घरांमधील काही घरेही मोठ्या संख्येने विजेत्यांनी मुंबई मंडळाला परत केल्याची खात्रीलायक माहिती आहे. उच्च गटातील घरे इतक्या मोठ्या संख्येने परत होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे.
लोअर परळ भागातील या महागड्या घरांना अर्जदारांकडून म्हणावा तसा प्रतिसादही मिळाला नव्हता. महत्त्वाचे म्हणजे ही घरे खासगी विकासकांच्या तुलनेत महागडी असल्याची टीकाही त्यावेळी म्हाडावर झाली होती. तर किमती कमी करण्याचीही मागणी त्यावेळी झाली होती. मात्र तरीही मुंबई मंडळाने या घरांसाठी सोडत काढलीच. ज्या 29 विजेत्यांनी म्हाडाला घरे परत केली आहेत ती घरे आता प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचेही म्हाडाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.