Thu, Mar 21, 2019 11:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एमएस्सीची परीक्षा विद्यापीठाने पुढे ढकलली!

एमएस्सीची परीक्षा विद्यापीठाने पुढे ढकलली!

Published On: Jan 24 2018 1:53AM | Last Updated: Jan 24 2018 1:44AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाने  एमएस्सी-पार्ट 1च्या परीक्षा पुढे ढकलल्या आहे. या अभ्यासक्रमाचे एकही लेक्चर्स झाले नसताना विद्यापीठाने 23 जानेवारीपासून घेणार असल्याचे जाहीर केले होते. विद्यार्थ्यांनी विरोध केल्यानंतर आता ही परीक्षा 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. 

 एमएस्सी पार्ट-1चे (मायक्रो बायोलॉजी) वर्ग 8 नोव्हेंबर रोजी सुरू झाले. मात्र अनेक कॉलेजमध्ये एकही लेक्चर झाले नसताना विद्यापीठाने या परीक्षा घेत असल्याचे जाहीर केले होते. विशेष म्हणजे याआधी ही परीक्षा 27 डिसेंबरपासून घेणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते. मात्र कायद्यानुसार निर्धारित सत्राचे 90 दिवस झाले नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी विरोध केल्याने या परीक्षा पुढे ढकलून 23 जानेवारीपासून घेण्याचे जाहीर करण्यात आले. 

गोरेगांव येथील पाटकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तर अद्याप एकही लेक्चर झाले नसल्याची तक्रार युवा सेनेकडे केली होती. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासक्रम शिकवला नसताना परीक्षा कशी देणार असा सवाल उपस्थित करीत युवा सेना शिष्टमंडळाने प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना निवेदन देऊन परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात केली होती. आता विद्यापीठाने जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार मायक्रोबायोलॉजी पेपर - 1 चा 23 जानेवारीला होणारी परीक्षा 9 फेब्रुवारीला, पेपर - 2 ची 25 जानेवारीला होणारी परीक्षा 12 फेब्रुवारीला, पेपर 3 ची 29 जानेवारीला होणारी परीक्षा 14 फेब्रुवारीला तर पेपर - 4 ची 31 जानेवारीला होणारी परीक्षा 16 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे परीक्षा विभागाने परिपत्रकातून स्पष्ट केले.