Mon, Mar 25, 2019 04:59
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बदलापुरात साडेसात कोटींचे ‘एमडी’रसायन जप्त

बदलापुरात साडेसात कोटींचे ‘एमडी’रसायन जप्त

Published On: Apr 16 2018 2:13AM | Last Updated: Apr 16 2018 1:58AMमुंबई/ बदलापूर : प्रतिनिधी

मुंबईत एमडी या अमली पदार्थांची विक्री करण्यास आलेल्या शाहिद मोहम्मद शहा (27) या व्यक्तीला आंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटक करण्यात आली होती. या व्यक्तीने दिलेल्या माहितीवरून आंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बेंडाळे आणि पोलीस उपनिरीक्षक दया नायक यांच्या पथकाने बदलापुरातील शारदा केमिकल्स कंपनीवर शनिवारी सायंकाळी छापा टाकून या कंपनीतून एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे 78 किलो 500 ग्रॅम वजनाचे   केमिकल जप्त केले आहे. त्याची किंमत अंदाजे 7.5 कोटी रुपये आहे.  हे केमिकल अमली पदार्थ म्हणून वापरले जाते. याला मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. घटनास्थळाहून पोलिसांनी तीन निळ्या रंगाचे प्लास्टिक कॅनसह अन्य साहित्य आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत. .

बदलापुरात शारदा केमिकल्स ही एक बंद पडलेली कंपनी आहे. या कंपनीत अवघे दोन ते चार कामगार काम करत असल्याचे समजते. मुंबईत विक्रीसाठी आलेल्या शाहिद मोहम्मद शहा (27) याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला. त्याने दिलेल्या माहितीवरूनच पोलिसांनी बदलापूर येथे छापा टाकून एमडी बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणात ताब्यात घेतला आहे. तसेच या कंपनीचा मालक व एमडी बाळगणार्‍या नारायणभाई मंगलदास पटेल या 74 वर्षीय वृद्ध गृहस्थाला देखील पोलिसांनी अटक केली असून या दोघांनाही वांद्रे न्यायालयाने 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बदलापूर आणि परिसरात अशाप्रकारे एमडी बनविणार्‍या कंपनीचा पर्दाफाश झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईमध्ये हे अमली पदार्थ अवैधरित्या पुरवठा केले जायचे, त्याची किंमत कोट्यवधी रुपये होती. मात्र अशाप्रकारे एखादी केमिकल कंपनी अमली पदार्थ तयार करते आणि त्याची माहिती कोणालाही समजत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. शारदा केमिकल्स कंपनी ही खरवई एमआयडीसीत आहे.  पोलिस कारवाईनंतर या कंपनीला सील ठोकण्यात आले आहे. 

Tags : mumbai, Badlapur, M.D. chemicals,  seized, around seven crore, mumbai news,